Vidarbha News India:-
Mumbai:-
MPSC : आधी परीक्षा पुढे ढकलली, आता परीक्षार्थींना इशारा? महाराष्ट्र लोकसेवा आयोगावर टीका का होतेय?
परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यामुळे परीक्षार्थींकडून संताप व्यक्त केला जात आहे. तसंच काही जणांकडून आयोगावर टीकाही केली जातेय. या पार्श्वभूमीवर आयोगाने एक पत्रक काढून कारवाईचा इशारा दिलाय.
MPSC : आधी परीक्षा पुढे ढकलली, आता परीक्षार्थींना इशारा? महाराष्ट्र लोकसेवा आयोगावर टीका का होतेय?
महाराष्ट्र लोकसेवा आयोग
मुंबई : एमपीएससी (MPSC) अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (Maharashtra Public Service Commission) 2 जानेवारी रोजी होणारी पूर्वपरीक्षा (MPSC Exam) पुढे ढकलण्यात आली आहे. तसा निर्णय आयोगाकडून मंगळवारी जाहीर करण्यात आला आहे. महत्वाची बाब म्हणजे या निर्णयावेळी ही परीक्षा पुढे कधी घेतली जाणार, याची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यामुळे परीक्षार्थींकडून संताप व्यक्त केला जात आहे. तसंच काही जणांकडून आयोगावर टीकाही केली जातेय. या पार्श्वभूमीवर आयोगाने एक पत्रक काढून कारवाईचा इशारा दिलाय.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या प्रसिद्धीपत्रकात काय?
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित भरती प्रक्रियेसंदर्भात एखाद्या विशिष्ट पद्धतीने निर्णय घेण्याबाबत अथवा निर्णय न घेण्याबाबत कोणत्याही प्रकारे प्रयत्न केल्यास अशी कृती आयोगावर दबाव आणण्याचा प्रयत्न समजण्यात येईल व अशा प्रकरणाबाबत आयोगाकडून गंभीर दखल घेण्यात येईल. असे आयोगाच्या दि. 30 सप्टेंबर, 2021 रोजीच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे आयोगाच्या संकेतस्थळावर सुचित करण्यात आले आहे.
आयोगाच्या कार्यपद्धतीविषयी आणि/अथवा काही निर्णयांविषयी नाराजी असणाऱ्या, तसेच आयोगाच्या काही निर्णयांमुळे प्रभावित होणाऱ्या उमेदवारांकडून आयोगाच्या कार्यपद्धती आणि/अथवा निर्णयांवर जाहीर टीका-टिप्पणी करण्यात येते. तथापि, आयोगावर टीका-टिप्पणी करत असताना शासकीय सेवेत येऊ इच्छिणाऱ्या भावी लोकसेवकांकडून सार्वजनिक सभ्यतेचे भान ठेवून संसदीय व सुसंस्कृत भाषा शैलीचा वापर केला जाणे अपेक्षित आहे. परंतू, काही उमेदवार/व्यक्ती यांच्याकडून विविध प्रसारमाध्यमे/समाजमाध्यमे यावर मत/अभिप्राय व्यक्त करताना किंवा दूरध्वनीवरुन संवाद साधताना असभ्य, असंस्कृत, असंसदीय व अश्लील भाषेचा वापर करण्यात येत असल्याची बाब आयोगाच्या प्रकर्षाने लक्षात आली आहे.
आयोगास निदर्शनास आलेल्या उपरोक्त बाबींची आयोगाच्या कार्यालयाकडून गंभीर दखल घेण्यात येत असून अशा उमेदवार/व्यक्ती यांच्यावर संबंधित कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल. तसेच, आयोगाच्या स्वेच्छाधिकारानुसार आयोगामार्फत आयोजित सर्वच परीक्षा व निवडीपासून संबंधिताला कायमस्वरुपी अथवा काही विशिष्ट कालावधीसाठी प्रतिरोधित करण्याची कारवाई करण्यात येईल.
आयोगाच्या प्रसिद्धीपत्रकावर आक्षेप
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या या प्रसिद्धीपत्रकानंतर आयोगावर जोरदार टीका करण्यात येत आहे. एमपीएससीने आधी परीक्षा वेळेवर घेऊन त्याचे निकाल नीट लावायला शिकावं. ते करायचं सोडून परीक्षार्थींना धमकी देणारी पत्रं लिहिण्यात वेळ, शक्ती खर्च केली जात आहे. असभ्य, अश्लील टीकेचं समर्थन नाही. पण या व्याख्येच्या आडून विरोधात बोलूच नये अशी योजना दिसत आहे. मुळात अशी टीका होणार नाही, असा कारभार एमपीएससीने करावा, असा सल्लाही आयोगाला दिला जात आहे.