दि. 8 जुलै 2024
Vidarbha News India
महसूल गुप्तचर यंत्रणेने आठ कोटी रुपयांचे रक्तचंदन पकडले.!
विदर्भ न्यूज इंडिया
मुबंई : नवी मुंबईतील जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टच्या बंदरातून (जेएनपीटी) महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) पुणे कार्यालयातील पथकाने कारवाई करून आठ टन रक्तचंदन जप्त केले. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली असून, जप्त करण्यात आलेल्या रक्तचंदनाची आंतरराष्ट्रीय बाजारात सात कोटी ९० लाख रुपये किंमत आहे.
नवी मुंबईतील जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टच्या बंदरातून परदेशात जहाजातून रक्तचंदन पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती महसूल गुप्तचर संचालनालयाच्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे रक्तचंदन घेऊन बंदरात निघालेला कंटेनर पथकाने अडवला. कंटेनरमध्ये सहा टन रक्तचंदन सापडले. पथकाने निर्यातदार, दलाल, गोदाम व्यवस्थापक आणि वाहतूकदारासह पाच जणांना अटक केली. चौकशीनंतर पथकाने अहमदनगर, नाशिक आणि हैदराबाद येथे कारवाई केली आहे.
महसूल गुप्तचर संचालनालयाच्या पथकाकडून नाशिक येथील एका गोदामावर छापा टाकण्यात आला. या गोदामातून दोन टन रक्तचंदन जप्त करण्यात आले. या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.