Vidarbha News India:-
राज्यसेवा पुर्व परीक्षा 23 जानेवारीला...!
नववर्षात 2 जानेवारीला होणारी राज्य सेवेची पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. कोरोना काळात वयोमर्यादा संपलेल्या उमेदवारांना या परीक्षेसाठी अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून दिली होती. त्यामुळे ही परीक्षा पुढे गेली होती. नव्या वेळापत्रकाची घोषणा नुकतीच झाली असून आता ही परीक्षा 23 जानेवारीला होणार आहे. कोरोनामुळे मागील दोन वर्षात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला त्यांच्या नियोजित वेळापत्रकानुसार परीक्षा घेता आल्या नाहीत. राज्य सरकारकडूनही आयोगाला वेळेत मागणीपत्र सादर करता आले नाही. दरम्यान, आयोगाने या वर्षी होणाऱ्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक यापूर्वीच जाहीर केले आहे.
750 केंद्रांवर परीक्षेचे नियोजन
राज्यातील अडीच लाख उमेदवार राज्य सेवेची पूर्व परीक्षा देणार आहेत. त्यासाठी जिल्हास्तरावर काही केंद्रांमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. राज्यभरात परीक्षेची 750 केंद्रे असतील, असेही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, परीक्षेला विलंब झाल्यास पुन्हा काही उमेदवारांची वयोमर्यादा संपुष्टात येऊन त्यांच्यासाठी स्वतंत्र निर्णय घ्यावा लागेल, अशी भीती होती. त्यामुळे आता ही परीक्षा 23 जानेवारीला होणार आहे.