VNI:-
येत्या एक जूनपासून गोंडवाना विद्यापीठाच्या परीक्षा ऑफलाईन
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाच्या वतीने शैक्षणिक सत्र 2021-22 मधील उन्हाळी 2022 ची लेखी परीक्षा १ जून पासून नियोजित वेळापत्रकानुसार ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे. आजी-माझी सर्व मिळून जवळपास एक लाख 38 हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. परीक्षेसाठी लागणाऱ्या प्रश्नपत्रिका प्रत्येक परीक्षा केंद्रावर विद्यापीठाच्या वतीने ऑनलाईन प्रश्नपत्रिका डिलिव्हरी पद्धतीने पोहोविण्यात येणार आहे. या संदर्भात गोंडवाना विद्यापीठात विदयापरिषद सदस्यांची बैठक नुकतीच घेण्यात आली.
या बैठकीत प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी संबंधित अभ्यासक्रमांच्या वेळापत्रकानुसार संबंधित परीक्षार्थींना ३ तास ४५ मिनिटे वेळ देण्यात येणार आहे.
प्रश्नपत्रिका ही डिस्क्रिप्टीव्ह स्वरूपात राहणार असून प्रात्यक्षिक परीक्षा ही ऑफलाईन होणार आहे. यासंदर्भात परीक्षेचे वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे. असा सर्वानुमते निर्णय विद्यापरिषदेच्या बैठकीत घेण्यात आला.
या बैठकीला गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल झेड. चिताडे तसेच विद्या परिषदेचे सदस्य उपस्थित होते.
सदर परीक्षा नियमित पाच प्रश्नांची राहणार असून प्रश्नपत्रिका 80 गुणांची राहणार आहे. त्यामध्ये काही लघुत्तरी प्रश्न असावे असे आवाहन कुलगुरू, प्र-कुलगुरू व कुलसचिव यांनी केले व उपस्थित सर्व सदस्यांनी ह्यास पाठिंबा दर्शविला.