VNI:-
गडचिरोली येथे मेडिकल कॉलेज होणार; मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी केली घोषणा : आ.डॉ. देवराव होळी यांच्या प्रयत्नांना यश
- मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली येथे मेडिकल कॉलेज मंजुरीची केली घोषणा
- आमदार डॉक्टर देवराव होळी यांचे सह जिल्हावासियांनी मानले मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे आभार
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडिकल कॉलेज) व्हावे याकरिता आमदार डॉक्टर देवराव होळी सातत्याने प्रयत्नशील होते. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या अगोदर मेडीकल कॉलेजला मंजुरी देण्यात यावी या मागणीसाठी त्यांनी सातत्याने राज्य सरकारकडे पाठपुरावा केला. त्याकरिता जिल्ह्यातील सर्व पक्षीय नेते, आमदार, खासदार यांचाही पाठींबा मिळविला राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री यांचेसह सर्व मंत्र्यांच्या भेटी घेतल्या.
आज अखेर त्यांच्या या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश आले असून गडचिरोली येथे मेडिकल कॉलेजला मंजुरी देत असल्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गडचिरोली येथे केली.
मेडिकल कॉलेजच्या मंजुरीच्या घोषणेबद्दल आमदार डॉक्टर देवराव होळी यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहे.
आमदार डॉक्टर देवराव होळी यांनी गडचिरोली येथे मेडिकल कॉलेज व्हावे याकरिता सातत्याने शासनाशी पत्रव्यवहार, बैठका भेटी ,चर्चा केल्या मध्यंतरीच्या काळामध्ये मेडिकल कॉलेज ऐवजी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याचा महाविकास आघाडी सरकारचा प्रयत्न या विरोधात त्यांनी ठाम भूमिका मांडली होती. प्रथमतः जिल्ह्यात मेडिकल कॉलेज व्हावे त्यानंतरच सुपर स्पेशलिटी चा विचार करण्यात यावा यासाठीही त्यांनी शासनाकडे आग्रह धरून पत्रव्यवहार केला. मात्र राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीने त्याकडे दुर्लक्ष केले परंतु. आज राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वातील सरकारने मेडिकल मंजुरीचा घेतलेला निर्णय अभिनंदनीय असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
गडचिरोलीच्या रुग्णांना लहान सहान उपचारासाठी सातत्याने नागपूर- चंद्रपूर येथे मेडिकल कॉलेज किंवा खाजगी रुग्णालयांमध्ये पुढील उपचारासाठी जावे लागते. यामध्ये अधिकचे अतंर असल्याने अनेक रुग्णांना मध्येच आपला जीव गमवावा लागलेला आहे. गडचिरोली च्या दुर्गम भागातून अनेक रुग्णांना जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात येते परंतु सोयी सुविधाना अभावी अनेक रुग्णांना बाहेर रेफर करावे लागते त्यात अनेकांचा नाहक जीवही जातो. त्यामुळे येथील रुग्णांना प्रभावी उपचार यंत्रणा मिळावी वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात शिक्षण घेवू इच्छिणाऱ्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनाही येथे संधी मिळेल याकरिता आमदार डॉक्टर देवराव होळी यांनी सातत्याने या वैद्यकीय महाविद्यालयासाठी प्रयत्न केले. आज त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून गडचिरोलीच्या पहिल्याच दौऱ्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेडिकल कॉलेजला मंजुरी दिल्याबद्दल आमदार डॉक्टर देवराव होळी यांनी त्यांचे आभार मानले आहे.