Vidarbha News India - VNI
प्रवीण मुंजमकार यांचा "माझे संविधान माझा आत्मसमान" हा नवोपक्रम ठरतोय लक्षवेधी
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : १५ ऑगस्ट २०२२ रोजी भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संपूर्ण भारत वर्षात हर्षोत्सहाने साजरा झाला. त्या अनुषंगाने वर्षभर विविध उपक्रम तसेच नवोपक्रम राबवून आपल्या स्तरावर हा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. याचेच औचित्य साधून जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बोडदा येथील शिक्षक श्री प्रवीण यादव मुंजमकर यांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना संविधानाची आवड निर्माण व्हावी या हेतूने "माझे संविधान माझा आत्मसन्मान" या विषयावरील नवोपक्रम केला. या उपक्रमामुळे शाळेतील विद्यार्थ्यांकडून विविध उपक्रमाद्वारे संविधानाची प्राथमिक ओळख करून देण्यात आली. यामुळे विद्यार्थ्यांना संविधानाची प्रस्तावना, संविधानातील मार्गदर्शक तत्वे, संविधानाने दिलेले अधिकार, संविधानाने दिलेल्या जबाबदाऱ्या, आपली कर्तव्य या संबंधित विविध कलमा माहिती झाल्या.
कित्येक विद्यार्थ्यांना संविधानातील अनुच्छेद मुखोद्गत झाले. आणि संविधानातील आपले अधिकार माहित झाल्याने जीवन जगण्यात आत्मविश्वास आला. हल्ली संविधान हा विषय फार क्लिष्ट जरी असला तरी या नवोपक्रमाने शाळेतील प्राथमिक विद्यार्थ्यांना सुद्धा अतिशय आवडीने संविधान शिकण्याची, संविधान स्वयं अध्ययन करण्याची आवड निर्माण झाली. हे त्यांच्या कृतीतून दिसून येते. संविधान सरनामा यावरती शाळेतील विद्यार्थ्यांकडून अप्रतिम अशी व्हिडिओ निर्मिती करून संविधानाचा मान सन्मान जपण्याचा प्रयत्न करण्यात आला. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना संविधान अभ्यास झाल्याने भावी आयुष्यात देशाचा सुजाण नागरिक निर्माण होण्यास नक्की मदत होईल आणि कित्येक विद्यार्थ्यांना व शिक्षकांना हा नवोपक्रम स्वयंअध्ययनाकरिता प्रवृत्त करेल यात मात्र शंका नाही.