दि. २९ डिसेंबर २०२२
Vidarbha News India - VNI
गडचिरोलीबाबत शिंदे आणि फडणवीसांची तातडीची बैठक; दिले महत्त्वाचे निर्देश, आयजी, डीआयजी उपस्थित
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : जिल्ह्यात रखडलेली विकासकामे आणि माओवादविरोधी अभियानाची परिस्थिती यावर राज्याचे मुख्यमंञी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांनी विशेष आढावा घेणारी उच्च पातळीवरची नागपुरात बैठक घेतली.
राज्याचे मुख्य सचिव पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांच्यासह डीआयजी संदीप पाटील उपस्थित होते. या उच्चस्तरीय बैठकीत रखडलेल्या विकास कामांचा आढावा घेण्यात आला आहे.
गडचिरोली जिल्ह्यातल्या अतिदुर्गम गावांना आणि तालुक्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कोटयावधी रुपयांची मोठया प्रमाणात रस्ते आणि पुलाची बांधकाम मंजूर झाली आहेत. पण वनविभागाच्या परवानगीसाठी कामे रखडल्याने त्या परवानग्या 31 जानेवारीच्या आत देण्याचे निर्देश मुख्यमंञी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत.
जिल्हयात माओवाद संपवण्यासाठी रस्ते आणि पुलांचे बांधकाम आवश्यक असुन महत्वपूर्ण विकास कामांना थांबवू नका अशा शब्दात स्पष्ट सूचना एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांनी केल्या.जिल्ह्यात अनेक गावांत मोबाईल सेवा नसल्याने जिल्ह्यात मोबाईल टावर उभे करण्याचे निर्देश देण्यात आले.
यावेळेस माओवादविरोधी अभियानाचा विशेष आढावाही घेण्यात आलाय. देशात सर्वाधिक यश माओवादविरोधी अभियानात मिळाल्याने पोलीस दलाचे विशेष कौतुक मुख्यमंञी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांनी केले.