दि. २० डिसेंबर २०२२
गोंडवाना विद्यापीठात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची अंमलबजावणी म्हणजे शैक्षणिक प्रगतीमध्ये नवी पहाट आहे ; आर. पी. निकम
शिक्षक आणि प्राचार्यांशी संवाद साधतांना प्रा. डॉ.विवेक जोशी
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : गुणवत्तापूर्ण, सर्वांसाठी समान व व्यावसायिक कौशल्यावर आधारित शिक्षण तसेच राष्ट्रीय विकासासाठी सक्षम व चारित्र्यसंपन्न पिढी निर्माण करणारी शिक्षणाची उद्दिष्टे ही आजवर साध्य होऊ शकलेली नाहीत. आता या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार प्रचलित शिक्षण व्यवस्थेत बदल करून ही उद्दिष्टे साध्य करणे आवश्यक आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०ची अंमलबजावणी म्हणजे शैक्षणिक प्रगतीमध्ये नवी पहाट आहे असे प्रतिपादन माध्यमिक शिक्षण अधिकारी गडचिरोली आर .पी . निगम यांनी केले.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन गोंडवाना विद्यापीठात करण्यात आले होते. याप्रसंगी अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, प्र-कुलगुरू डॉ.श्रीराम कावळे,कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन, माध्यमिक शिक्षण अधिकारी आर. पी .निकम , विज्ञान व तंत्रज्ञान अधिष्ठाता डॉ.शैलेंद्र देव आणि विद्यापीठातील राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे समन्वयक डॉ. विवेक जोशी उपस्थित होते.
शिक्षणात होणाऱ्या बदलांचे ज्ञान विद्यार्थ्यांना देऊन त्याचा फायदा विद्यार्थ्यांना कसा होईल. याचे मार्गदर्शन शिक्षकांनी केलं पाहिजे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०ची भूमिका शिक्षकांनी विद्यार्थ्यांना समजून सांगावी यासाठीच विद्यापीठाने या कार्यशाळेत सहभाग घेतलाय,असे मार्गदर्शनात प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे म्हणाले.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे म्हणाले, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०मुळे बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांच्या , पालकांच्या मनात अनेक संभ्रम असतात.हे संभ्रम दूर करणारे महत्त्वाचे माध्यम म्हणजे शिक्षक आहे. या कार्यशाळेमुळे शिक्षक शिकतील आणि याचे चिंतन होईल. विद्यार्थी, पालक ,समाज यामुळे एकदम विश्वस्त होईल.
गोंडवाना विद्यापीठ हे कदाचित महाराष्ट्रातले पहिले विद्यापीठ आहे. जे माध्यमिक शिक्षकांच्या संदर्भात कार्यशाळा घेत आहे आहे. देशाच्या जडणघडणीत शिक्षकांचा वाटा मोठा आहे असे ते म्हणाले.
गडचिरोली, चामोर्शीआणि धानोरा या तालुक्यातील माध्यमिक शिक्षक आणि प्राचार्यांसाठी या एक दिवसीय कार्यशाळाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत डॉ. विवेक जोशी यांनी शिक्षक आणि प्राचार्यांना मार्गदर्शन करत त्यांच्या शंकांचे निरसन केले. प्रास्ताविक विज्ञान व तंत्रज्ञान अधिष्ठाता डॉ.शैलेंद्र देव, संचालन प्रा.गौरी ठाकरे यांनी तर आभार डॉ.विवेक जोशी यांनी मानले.