गोंडवाना विद्यापीठाची आंतरराष्ट्रीय शैक्षणिक स्तरावर वाटचाल
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली
आणि व्याटका स्टेट युनिव्हर्सिटी, किरोव, रशियन फेडरेशन यांच्यात सामंजस्य करार झाला होता. या सामंजस्य कराराला उच्च व तंत्रशिक्षण विभाग,महाराष्ट्र शासन यांनी मान्यता प्रदान केली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय शैक्षणिक पटलावर गोंडवाना विद्यापीठाने पाऊल ठेवले आहे. या करारामध्ये शैक्षणिक सहयोग, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांची देवाणघेवाण, संशोधन पदवी, संसाधनांची देवाणघेवाण, उन्हाळी कार्यक्रम, इंटर्न एक्सचेंज आणि शिष्यवृत्तीच्या संधी इत्यादी व्यापक पैलू आणि क्षेत्रांचा समावेश आहे.
सामंजस्य कराराच्या तरतुदींतर्गत पहिल्या उपक्रमाचा भाग म्हणून, प्राथमिक स्तरावर रशियन भाषेचा १०० तासांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम जानेवारी २०२३ पासून सूरू होत आहे. व्याटका स्टेट विद्यापीठ रशियन भाषा शिकवेल. त्या बदल्यात गोंडवाना विद्यापीठ इंग्रजी भाषेतील समान अभ्यासक्रम त्यांना देईल.
हा सामंजस्य करार समान देवाणघेवाण तत्वावर आधारित आहे. या निमित्ताने विद्यार्थ्यांना रशियन भाषा शिकण्याचे संधी गोंडवाना विद्यापीठामुळे उपलब्ध झाली आहे.
तळागळ्यातल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना रोजगारासह, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षण मिळवून देणे हाच ध्यास विद्यापीठाने घेतला आहे.