दि. १० जानेवारी २०२३
खेळांच्या माध्यमातून करीयर घडवा ; जिल्हा अधिकारी संजय मीना
विदर्भ न्यूज इंडिया
(गडचिरोली)
ता. प्रतिनिधी चामोर्शी :
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले, आपल्या इथे मुलांना लहानपणापासूनच शैक्षणिक गुणवत्तेसाठी जास्त जोर दिला जातो. तसे तर आपण सरासरी 35 वयापर्यंत किंवा पुढेही शिकू शकतो. मात्र खेळात करीअर घडविण्यासाठी आपणाला 10 ते 15 वयापर्यंतच शरीर तयार करावे लागते व त्याच वयात आपल्याला खेळाचे खऱ्या अर्थाने कौशल्य प्राप्त होते. खेळांमधे राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्याकडील मुलांचे प्रमाण फारच नगण्य असून त्या क्षेत्रात करीअर करण्यासाठी मोठी संधी उपलब्ध आहे. शाळेत किमान एक तास दररोज खेळायला हवे असे ते पुढे म्हणाले. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी रूपाली दुधबावरे सरपंच, सचिन अडसूळ जिल्हा माहिती अधिकारी, संदिप रोंडे सहायक पोलीस निरीक्षक घोट उपपोलीस स्टेशन, हरीदास चलाख, प्रकाश भांदककर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, वर्षा मनवर अध्यक्षा बाल कल्याण समिती, अविनाश गुरनुले जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, विलास ढोरे, पुरूषोत्तम मेश्राम उपस्थित होते.
खेळाचे महत्त्व पटवून देताना जिल्हाधिकारी मीणा म्हणाले, खेळामुळे चांगले शरीर चांगले आरोग्य कमवता येते. बालगृहातील मुलींनी आयुष्याची काळजी करण्याचे सोडून या वयात शिक्षणाबरोबर खेळाकडे जास्त लक्ष द्यावे. इच्छाशक्ती व चिकाटीतून आपले भविष्य घडविण्यासाठी या महोत्सवात योगदान द्या. संस्थेतील प्रवेशितांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी वेगवेगळ्या स्पर्धांचे व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून मुलांना त्यांच्यातील कलात्मक गुण, कौशल्य दाखवून देण्याची चांगली संधी प्राप्त होते. या महोत्सवामधे कबड्डी, धावण्याच्या स्पर्धांबरोबर सांस्कृतिक कार्यक्रम, निबंध, चित्रकला, गायन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव 12 जानेवारी पर्यंत घोट येथील बालगृहात संपन्न होणार आहे. विजेत्या मुलींना पुढिल विभागीय स्पर्धेसाठी नागपूर येथे पाठविण्यात येणार आहे.