दि. १६ जानेवारी २०२३
आव्हानांचा सामना म्हणजे जीवनाचा वास्तविक विकास; प्रा. सुदर्शन कुरवाडकर
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : विद्यार्थीदशेत असतांना आपल्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. तसेच जीवनात अनेक आव्हानही असतात. आव्हानयुक्त जीवन चांगलं आहे कारण आव्हानांचा स्वीकार करण्यातच जीवनाचा वास्तविक विकास शक्य आहे. आव्हांनाशिवाय आपण कोणताही नवी गोष्ट शिकू शकणार नाही किंवा विषम परिस्थितीत त्याच्याशी झगडण्याचा संकल्प किंवा साहस आपण करू शकणार नाही. अडथळे आपल्याला मागे वळून पाहण्यात आणि आत्मपरीक्षण किंवा पुर्नमूल्यांकन करण्याची संधी देत असतात.आव्हानांचा सामना म्हणजे जीवनाचा वास्तविक विकास असा संदेश
स्थापत्य आणि पर्यावरण अभियांत्रिकी विभाग, कॅलिफोर्निया स्टेट युनिव्हर्सिटी, फुलरटन, प्रा.डॉ. सुदर्शन कुरवाडकर यांनी दिला.
गोंडवाना विद्यापीठातील पदव्युत्तर शैक्षणिक विभागातील सर्व विद्यार्थांकरिता विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने त्यांच्या संवादाचा कार्यक्रम नुकताच आयोजित करण्यात आला होता . त्या प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी गोंडवाना विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. शैलैंद्र देव, गणित विभागाचे प्रा.संदिप कागे,रसायनशास्त्र विभाग प्रा. रवींद्र भुर्से, फुले आंबेडकर समाजशास्त्र महाविद्यालयाचे प्रा. दिलिप बारसागडे , आदी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी त्यांच्याशी संवाद साधत त्यांना असलेल्या शंकांचे निरसन करून घेतले.
प्रा. डॉ.सुदर्शन कुरवाडकर यांनी विद्यार्थ्यांना दिला हा मूलमंत्र
इतरांना दोष देऊ नका, जबाबदारी स्वीकारा कारणे शोधू नका ,आजचं काम उद्यावर ढकलू नका, प्रत्येक जण हुशार आहे त्यामुळे यशस्वी कसं व्हायचं हा विचार करा.