दि. 10/ 01/2023
Vidarbha News India - VNI
'आताच लग्न झालं, बायकोही फोन उचलेना, मला सुट्टी द्या' पोलीस कॉन्स्टेबलनं लिहिलं रजेसाठी पत्र
VNI - Uttar Pradesh
महाराजगंज : पोलीस सेवा ही अत्यावश्यक सेवा प्रकारामध्ये येते. त्यामुळे जास्त दिवस रजा मिळत नाही, अशी ओरड पोलीस कर्मचाऱ्यांमधून ऐकायला मिळते. जास्त दिवस रजा मिळावी यासाठी काही कर्मचारी विविध युक्त्या आणि कारणं शोधून काढतात.
सोशल मीडियावर सध्या एका पोलीस कॉन्स्टेबलच्या रजेचा मजेशीर अर्ज व्हायरल होत आहे. अर्ज लिहिणारा पोलीस कर्मचारी नेपाळच्या सीमेला लागून असलेल्या उत्तर प्रदेशातील महाराजगंज जिल्ह्यातील आहे. या कर्मचाऱ्यानं अतिरिक्त पोलीस अधीक्षकांना पाठवलेल्या पत्रात लिहिलं आहे की, महिनाभरापूर्वीच लग्न झालं असून, ड्युटीवर रुजू झाल्यामुळे पत्नी नाराज आहे. फोन केला असता ती न बोलता मोबाईल आईकडे देते.
महाराजगंज जिल्ह्यातील नौतनवा पोलीस स्टेशनच्या पीआरबीमध्ये नियुक्त असलेल्या कॉन्स्टेबलचा हा अर्ज व्हायरल होत आहे. नौतनवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पीआरबीवर तैनात असलेला कॉन्स्टेबल 2016 च्या बॅचमधील आहे. सध्या तो भारत-नेपाळ सीमेवरील पीआरबीमध्ये तैनात आहेत. तो मूळचा मौ (Mau) जिल्ह्यातील रहिवासी आहे.
रजेच्या अर्जात या कॉन्स्टेबलनं लिहिलं आहे की, गेल्या महिन्यातच त्याचं लग्न झालं आहे. त्यानंतर पत्नीला घरी सोडून तो ड्युटीवर रूजू झाला. आता त्याला घरी जाण्यासाठी रजा मिळत नाही. यामुळे पत्नीला राग आला आहे.
वारंवार फोन करूनही ती आपल्या पतीशी बोलत नाही. पतीचा फोन आल्यानंतर ती न बोलता मोबाईल तिच्या सासूकडे म्हणजेच कॉन्स्टेबलच्या आईकडे देते. कॉन्स्टेबलनं असंही लिहिले आहे की, 'मी माझ्या पुतण्याच्या वाढदिवसाला नक्कीच घरी येईन असं वचन मी माझ्या पत्नीला दिलं आहे. कृपया मला 10 जानेवारीपासून सात दिवसांची कॅज्युअल रजा द्या.
तुमचा ऋणी राहीन." या पत्रातून कॉन्स्टेबलनं पत्नीच्या नाराजीमुळे निर्माण झालेली वेदना व्यक्त केल्याचं दिसत आहे.
पत्नीच्या नाराजीचं कारण देत कॉन्स्टेबलनं पुतण्याच्या वाढदिवसानिमित्त सात दिवसांची रजा मागितली होती. मात्र, अतिरिक्त पोलीस अधीक्षकांनी पाच दिवसांची कॅज्युअल रजा मंजूर केली आहे.
त्यामुळे कॉन्स्टेबलची रजा 10 जानेवारीपासून सुरू होणार आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक आतिश कुमार सिंह यांनी सांगितलं की, 'कर्तव्यावर तैनात असलेल्या पोलिसांना त्यांच्या गरजेनुसार रजा मंजूर केली जाते. सुट्टीमुळे कामात कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, याकडेही विशेष लक्ष दिलं जातं. या बाबींचा विचार करूनच नौतनवा पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबलला अर्जाच्या आधारे पाच दिवसांची कॅज्युअल रजा मंजूर करण्यात आली आहे.