दि. ०२ जानेवारी २०२३
Vidarbha News India - VNI
Ved Movie : बॉक्स ऑफिसवर रितेश अन् जिनिलियाचा बोलबाला; 'वेड'ने तीन दिवसात जमवला 10 कोटींचा गल्ला
विदर्भ न्यूज इंडिया
मुबंई : बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) आणि जिनिलिया देशमुखचा (Genelia Deshmukh) 'वेड' (Ved) हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
रितेश आणि जिनिलियाचा 'वेड' हा सिनेमा 30 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी या सिनेमाने 2.25 कोटींची कमाई केली आहे. त्यानंतर शनिवारी 3.25 कोटी आणि रविवारी 4.50 कोटींची कमाई केली आहे. अशाप्रकारे प्रदर्शनाच्या तीन दिवसांत या सिनेमाने 10 कोटींची कमाई केली आहे.
'वेड' या सिनेमाने रेकॉर्ड करायला सुरुवात केली आहे. आजवर प्रदर्शित झालेल्या मराठी सिनेमांच्या यादीत हा सिनेमा सर्वाधिक कमाई करणारा ठरला आहे. रिलीजच्या तिसऱ्या दिवशी हा सिनेमा सर्वाधिक कमाई करणाऱ्या मराठी सिनेमांच्या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. आतापर्यंत या सिनेमाने 10.25 कोटींचा गल्ला जमवला आहे. लय भारीचा रेकॉर्ड मोडण्यासाठी हा सिनेमा सज्ज आहे.
तगडी स्टारकास्ट असलेला 'वेड'
'वेड' या सिनेमात जिनिलिया देशमुख आणि रितेश देशमुख मुख्य भूमिकेत आहेत. रितेश-जिनिलियासह अशोक सराफ, विद्याधर जोशी, जिया शंकर, शुभंकर तावडे हे कलाकारदेखील या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत झळकत आहेत. तसेच भाईजान सलमान खानची (Salman Khan) झलकदेखील प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे.
'वेड' या सिनेमाच्या माध्यमातून रितेश देशमुखने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं आहे. तर जिनिलियाने मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं आहे. त्यामुळे दोघांसाठी हा सिनेमा खास आहे. नववर्षाच्या सुरुवातीला रितेश आणि जिनिलियाने मराठी सिनेसृष्टीला सुगीचे दिवस दाखवले आहेत. एकंदरीत सध्या बॉक्स ऑफिसवर 'वेड' या सिनेमाचा बोलबाला आहे.