दि.१७.०३.२०२३
Vidarbha News India
ST Bus News : आजपासून महिलांना ST प्रवासात 50 टक्के सवलत, शासनाकडून आदेश जारी
विदर्भ न्यूज इंडिया
ST Bus News : राज्याच्या अर्थसंकल्पात (Maharashta Budget) उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक घोषणा केल्या आहेत.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून राज्यातील प्रवाशांसाठी याआधीच सवलत जाहीर करण्यात आली आहे. जवळपास 30 प्रकारच्या सवलती राज्य सरकारकडून देण्यात येतात. या सवलतीची शुल्क प्रतिपूर्ती राज्य सरकारकडून महामंडळाला करण्यात येते. राज्य परिवहन महामंडळांकडून 30 विविध सामाजिक घटकांना प्रवासी भाड्यात सवलती देण्यात येत आहेत.
राज्य शासन एसटी महामंडळाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना 33 ते 100 टक्के पर्यंत प्रवासी तिकीट दरात सवलत देते. यापूर्वी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त राज्य शासनाने 75 वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवासाची सवलत जाहीर केली होती. तसेच 65 ते 75 वर्षाच्या ज्येष्ठांना एसटीच्या बसमधून तिकीट दरात 50 टक्के सवलत देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार या दोन्ही घटकांना एसटीच्या प्रवासी भाड्यात सवलत दिली जाते. या प्रवाशांच्या तिकीट दरातील शुल्क प्रतिपूर्ती महाराष्ट्र सरकार करणार आहे.
एसटी प्रवासातील सवलतीबाबत शासनाने घोषणा 9 मार्चला केली तरी त्याची अंमलबजावणी करण्यासाठी शासन आदेशाची (GR) आवश्यकता असते. शासन आदेशाशिवाय कोणत्याही घोषणेवर अंमलबजावणी होत नाही. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व महिलांना एसटी महामंडळामधे सरसकट 50 टक्के तिकीट दरामधे सवलत जाहीर केली. परंतु, या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी जीआर निघाला नव्हता.
रेणापूरमध्ये एसटी वाहकाला झाली होती मारहाण
शासनाने घोषित केल्याप्रमाणे महिलांना तिकीटामध्ये 50 टक्के सवलत देण्याची मागणी महिला एसटी प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणावर होत आहे. काही ठिकाणी वादाचे रुपांतर भांडणात होऊ लागली असल्याने एसटी कर्मचारी भीतीच्या छायेत वावरत असल्याचा दावा कर्मचारी संघटनांनी केला आहे. लातूर जिल्ह्यातील रेणापूरमध्ये एका वाहकाला महिला प्रवाशाच्या नातेवाईकाने बेदम मारहाण केली. या मारहाणीत एसटी वाहक जखमी झाले असून रक्तबंबाळ झाले आहेत. पोलिसांनी आरोपी नातेवाईकाला ताब्यात घेतले असल्याची माहिती आहे.