दि.१८.०३.२०२३
Vidarbha News India
गडचिरोली : वीज कोसळून विद्यार्थिनीचा मृत्यू..!
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली/चामोर्शी : तालुक्यातील माल्लेर चक येथील एका विद्यार्थिनीचा आज (दि.१८) सकाळी साडेदहाच्या सुमारास वीज कोसळून मृत्यू झाला. स्वीटी बंडू सोमनकर (वय १५) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.
आज सकाळी शाळा सुटल्यानंतर स्वीटी सोमनकर ही सायकलने दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या माल्लेर चक या आपल्या गावाकडे जात होती. मात्र, त्याचवेळी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरूवात झाली. स्वीटीच्या अंगावर वीज कोसळल्याने ती गंभीर जखमी झाली. तिला गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
गडचिरोलीसह जिल्ह्यातील विविध तालुक्यात आज मेघगर्जनेसह पाऊस पडला. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. दुपारनंतर पाऊस थांबला. वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.