सहा हजार हेक्टरवर अवकाळी पावसामुळे नुकसान, कृषी विभागाचा प्राथमिक अंदाज... - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

सहा हजार हेक्टरवर अवकाळी पावसामुळे नुकसान, कृषी विभागाचा प्राथमिक अंदाज...

दि. ०८.०३.२०२३

Vidarbha News India - VNI

सहा हजार हेक्टरवर अवकाळी पावसामुळे नुकसान, कृषी विभागाचा प्राथमिक अंदाज...

विदर्भ न्यूज इंडिया

पुणे : गेल्या दोन दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे तोंडचे पाणी पळाले असून, सुमारे पाच ते सहा हजार हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यात उत्तर महाराष्ट्रात नुकसानीचे क्षेत्र जास्त आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश महसूल यंत्रणेला दिले आहेत. त्यानुसार कृषी विभागही त्यात सहभागी होत आहे. पंचनाम्यांनंतर प्रत्यक्ष आकडा हाती येईल, अशी माहिती कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली. ते म्हणाले, गेल्या दोन दिवसांपासून पावसामुळे नुकसान झालेल्या भागांतून अहवाल येत आहेत. आतापर्यंत पाच ते सहा हजार हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

विभागीय कृषी सहसंचालकांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार राज्यात अवकाळी पावसाने उत्तर महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात शेतीचे नुकसान झाल्याची माहिती हाती येत आहे. पंचनाम्यानंतर नुकसानीचा नेमका अंदाज येईल.

उत्तर महाराष्ट्र : तीव्रता अधिक
नाशिक विभागातील धुळे जिल्ह्यात गारपीट झाल्यामुळे येथे नुकसानीची तीव्रता जास्त आहे. तसेच जळगाव, नंदुरबार नाशिक, नगर जिल्ह्यांतही शेतमालाचे नुकसान झाले आहे.

विदर्भ, मराठवाड्यालाही फटका
विदर्भ व मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्हा वगळता उर्वरित सर्वच जिल्ह्यांत हजेरी लावली आहे. मराठवाड्यात केवळ संभाजीनगर जिल्ह्यात पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. विदर्भातील कोणत्याही जिल्ह्यांतून असा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही.

पालघर जिल्ह्यातून अहवाल प्राप्त
कोकण विभागात अद्याप पालघर जिल्ह्यातूनच अवकाळी पाऊस झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.

सोलापूर जिल्ह्यात नुकसान
पुणे विभागातील सोलापूर जिल्ह्यात नुकसान झाले आहे. पावसामुळे रब्बी हंगामातील कांदा, हरभरा, गहू तसेच फळ पिकांचे नुकसान झाले आहे.

नजर अंदाजानुसार नुकसानग्रस्त जिल्हे : पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर.

तातडीने नजर अंदाज घेऊन तसा अहवाल जिल्हाधिकारी राज्य सरकारकडे देतात. आता नजर अंदाज घेऊन आपत्तीची तीव्रता जाणून घेतली जाईल. आता प्रत्यक्ष पंचनामे सुरू होतील. त्यानंतर किती क्षेत्रावरील शेतीचे नुकसान झाले आहे, याचा योग्य आकडा देता येईल.
सुनील चव्हाण, कृषी आयुक्त

तत्काळ पंचनामे करा, मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश

  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी सकाळी राज्याचे मुख्य सचिव तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून त्यांच्याकडून परिस्थितीची माहिती घेतली. तसेच तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले.
  • शेतकऱ्यांना तातडीने दिलासा मिळाला पाहिजे. संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार उभे आहे. यादृष्टीने महसूल यंत्रणेने लगेच कामाला लागावे आणि पंचनामे करावेत, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासनाने सज्ज राहावे, अशा सूचनाही दिल्या आहेत.

Share News

copylock

Post Top Ad

-->