दि. १५.०५.२०२३
Vidarbha News India
गडचिरोली : चीचडोह बॅरेज मध्ये चार युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू..!
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली/चामोर्शी : सध्या राज्यभरात उन्हाचा तडाखा वाढत आहे. अशात लोक अंगाची लाहीलाही कमी करण्यासाठी पोहण्यास जात आहेत. मात्र, हिच गोष्ट गडचिरोली जिल्ह्यातील चार तरुणांच्या जीवावर बेतली आहे.
चामोर्शी तालुक्यात चिचडोह बॅरेजच्या खोलगट पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या चार युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच चामोर्शी पोलिसांनी घटनास्थळ गाठून स्वतःला दोरखंड बांधून पाण्यात जाऊन मृतदेह शोधुन चारही युवकांचे मृतदेह पाण्याबाहेर काढले. या घटनेबद्दल हळहळ व्यक्त होत आहे. चीचडोह बॅरेजच्या दरवाज्याखालील खोलगट भागात पोहण्यासाठी गेलेल्या चार युवकांचा पाण्यात बुडून मृत्यु झाल्याची घटना आज रविवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास घडली.
मोनु त्रिलोक शर्मा ( 26) रा. गडचिरोली, प्रफुल विठ्ठल येलुरे (20), शुभम रूपचंद लांजेवार (24), महेश मधुकर घोंगडे (20) सर्व राहणार कृषक हायस्कूल जवळ चामोर्शी असे मृतकांचे नाव आहेत.
कशी आहे घटना?
माहितीनुसार, हे सर्व युवक चीचडोह बॅरेजवर फिरायला गेले होते. या युवकांना पोहण्याची इच्छा झाल्याने ते बॅरेजच्या पाण्यात उतरले.
अशातच चार युवक खोलगट भागात गेल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच चामोर्शी पोलीस व बचाव पथकाने घटनास्थळ गाठून जिवाची पर्वा न करता बोट किंवा डोंगा (होडी) उपलब्ध नसल्याने त्यांनी स्वतः ला दोरखंड बांधून खोल पाण्यात उड्या मारल्या. साधारणतः एक तास शोधमोहीम केल्यावर चारही युवकांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले. स्थानिक युवकांनी पोलीसांना याकामी मदत केली. यावेळी पोलिस निरीक्षक राजेश खांडवे, पोलीस उपनिरीक्षक सुधीर साठे, पी एस आय तुषार पाटील व इतर पुलिस कर्मचारी उपस्थित होते.