दि. १२.०६.२०२३
Vidarbha News India
शेतकरी व कष्टकर्यांनाही निवृत्तीवेतन मिळावे : डॉ. महात्मे
Wardha Social Forum :
विदर्भ न्यूज इंडिया
वर्धा : सध्या जुनी पेन्शन लागू करण्याबाबत सर्वत्र आंदोलन सुरू आहे. ती मागण्याचा त्यांचा अधिकारही आहे.
पण, त्यासोबतच जगाचा पोशिंदा जो दिवसरात्र उन्हातान्हात राबतो त्या शेतकर्याला, शेतमजुराला, कारागिरांना आणि कष्ट करणार्या सार्यांनाच म्हातारपणाचा आधार म्हणून निवृत्तीवेतन सरकारने दिले पाहिजे. तो त्यांचा मानवी हक्क आहे, असे प्रतिपादन पद्मश्री डॉ. विकास महात्मे यांनी केले.
वर्धा सोशल फोरमद्वारे (Wardha Social Forum) आयोजित आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना बियाणे व जीवनोपयोगी वस्तू वितरणाच्या कार्यक्रमात काढले. या कार्यक्रमात जिल्ह्यातील कर्तृत्ववान महिलांना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. स्थानिक सत्यनारायण बजाज सार्वजनिक जिल्हा ग्रंथालयाच्या सभागृहात आयोजित या समारोहाच्या अध्यक्षस्थानी पोलिस अधीक्षक नुरुल हसन होते. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. सुनीता महात्मे, उपजिल्हाधिकारी विनायक महामुनी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रभाकर शिवणकर, वर्धा सोशल फोरमचे अध्यक्ष डॉ. अभ्युदय मेघे, सचिव अविनाश सातव, मनीषा मेघे यांची उपस्थिती होती.
वर्धा सोशल फोरमद्वारे (Wardha Social Forum) शेतकरी कुटुंबांतील एकल स्त्रियांना केवळ बी-बियाणेच दिले जात नाही त, आम्ही तुमच्या सोबत आहोत हा विश्वासही त्यांच्या मनात पेरला जातो. स्त्री ही मुळातच काटकसरी आणि सृजनशील आहे म्हणूनच भेट ही नेहमी तिच्याच हाती दिली पाहिजे, असेही डॉ. विकास महात्मे म्हणाले. मी शेतकरी कुटुंबातीलच असून शेतकर्यांची सुखदुःख मी जाणतो, असे सांगून पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी कोणतीही अडचण आल्यास शेतकरी परिवारातील सदस्याने संपर्क साधावा, त्यांच्या बाजूने आम्ही नेहमीच उभे राहू, अशी ग्वाही दिली. उपजिल्हाधिकारी विनायक महामुनी, प्रभाकर शिवणकर, डॉ. सुनीता महात्मे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.
या (Wardha Social Forum) कार्यक्रमात जिल्ह्यातील 105 आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील सदस्यांना बी-बियाणे, कृषी औषधी, मायेची गोधडी आणि दैनंदिन उपयोगाच्या वस्तू भेट देण्यात आल्या. याशिवाय वर्हाडी कवयित्री व कथाकार आशा निंभोरकर (तळेगाव), बचत गटांद्वारे असंख्य स्त्रियांना रोजगार देणार्या वैशाली पाटील, टेस्ट ट्युब बेबी प्रक्रियेद्वारे स्त्रियांना मातृत्वाची संधी देणार्या डॉ. दीप्ती श्रीवास्तव, स्ट्रॉबेरी वुमन भारती पाटील (कान्होली कात्री), मुक्या प्राण्यांची सेवा करणार्या सारिका मोकदम या कर्तृत्ववान महिलांना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नेत्रदानाची चळवळ राबवित लक्षावधी लोकांना दृष्टी देणारे, विदर्भात प्रथमतः नेत्रपेढी सुरू करणारे माजी खा. पद्मश्री डॉ. विकास महात्मे यांचा या समारोहात वर्धेकरांच्या वतीने सत्कार करण्यात आला. डॉ. महात्मे यांच्या संजय इंगळे तिगावकर यांनी शब्दबद्ध केलेल्या मानपत्राचे वाचन मनीषा मेघे यांनी केले. सत्कारमूर्तींच्या वतीने भारती पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमात इंटर्नशिप करणार्या डॉ. जुई मेघे या विद्यार्थिनीने आपल्या पहिल्या छात्रवृत्तीची पूर्ण रक्कम शेतकरी कुटुंबाच्या मदतनिधीला देत सामाजिक बांधिलकीची जाणीव करून दिली. (Wardha Social Forum)
प्रास्ताविकात डॉ. अभ्युदय मेघे यांनी केले. संचालन पल्लवी पुरोहित यांनी केले तर आभार अविनाश सातव यांनी मानले.
यशस्वीतेसाठी राहुल अवथनकर, चंद्रशेखर राठी, रवी शेंडे, श्रीकांत राठी, विजय देशपांडे, दिलीप कठाणे, गोविंद राठी, प्रदीप बजाज, हरीश ज्योतवानी, डॉ. शिल्पा सातव, नाना चौधरी, सोशल फोरमचे सहसचिव श्याम परसोडकर आदींनी सहकार्य केले.