दि. ०३.०६.२०२३
Vidarbha News India
गडचिरोली : १२ किलो गांजा जप्त, बापलेक जेरबंद!
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : मुलचेरा आणि गोंडपिपरी पोलिसांनी आज ( दि.३ ) सकाळी सुमारे १२ किलो गांजा जप्त केला. आनंद सपन मंडल व आलोक आनंद मंडल अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून, दोघेही कर्नाटक राज्यातील रहिवासी आहेत.
मुलचेरा तालुक्यातील बंदुकपल्ली येथून परराज्यात गांजाची तस्करी होणार असल्याची माहिती मुलचेरा पोलिसांना मिळताच पोलिसांनी बंदुकपल्ली गावातून चंद्रपूरला जाणाऱ्या ट्रॅव्हल्सवर नजर ठेवली. ट्रॅव्हल्स मुलचेरा येथे येताच पोलिस निरीक्षक अशोक भापकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आनंद मंडल याची झडती घेऊन त्याच्याकडून ७ किलो गांजा जप्त केला. त्यानंतर आनंद मंडल याने त्याचा मुलगा दुसऱ्या ट्रॅव्हल्सने चंद्रपूरला जात असल्याची माहिती दिली. त्यानुसार मुलचेरा पोलिसांनी गोंडपिपरी पोलिसांशी संपर्क साधला.
गोंडपिपरीचे पोलिस निरीक्षक जीवन राजगुरु आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ट्रॅव्हल्सची तपासणी करुन आलोक मंडल याच्याकडून ५ किलो गांजा जप्त केला. दोघांनाही अटक करण्यात आली आहे.२७ मेच्या रात्री गडचिरोली पोलिसांनी शहरातील इंदिरानगर नाक्यावरुन एका युवतीसह तीन जणांना १ लाख रुपयाच्या गांजासह अटक केली होती. त्यानंतर आठवडाभरातच जिल्ह्यातील ही दुसरी कारवाई आहे.