दि. १६.०७.२०२३
Vidarbha News India
गडचिरोली : देवदा नाल्याला पुलाची प्रतिक्षा.! कधी बनेल पूल.? तीन तालुक्यातील नागरिकांचा जीवघेणा प्रवास..!
विदर्भ न्यूज इंडिया
Waiting for a bridge
गडचिरोली : एकीकडे शासन मेक इन इंडियाचा नारा देत विकासाच्या वल्गना मारित आहे. मात्र आदिवासीबहूल गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाप्रती शासन व प्रशासन नेहमीच उदासीन धोरण अवलंबवित आल्याचे चित्र कायम आहे.
जिल्ह्यातील अनेक नदी, नाल्यांवर पुलाची निर्मिती न झाल्याने नागरिकांना पावसाळ्यात जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. असाच प्रकार रेगडी जवळील देवदा नाल्याबाबत निदर्शनास येत आहे. जिल्हा निर्मितीच्या चार दशकानंतरही या नाल्याला पुलाची प्रतिक्षा कायम आहे.
परिणामी पावसाळ्याच्या कालावधीत तब्बल तीन तालुक्यातील नागरिकांना याचा फटका बसत आहे. एटापल्ली तालुक्याअंतर्गत अतिसंवेदनशील, अतिदुर्गम अशा क्षेत्रात देवदा नाला पडतो. waiting for a bridge या नाल्यावरुन एटापल्ली, मुलचेरा तसेच चामोर्शी तालुक्यातील नागरिक नेहमीच मार्गक्रमण करीत आले आहे. मात्र, सदर नाला पावसाळ्याच्या कालावधीत या नागरिकांसाठी धोकादायक ठरत आला आहे. मागील अनेक वर्षापासून येथे पुलाचीनिर्मिती करण्याची मागणी होत आहे. यासाठी अनेकदा प्रशासन, लोकप्रतिनिधींची मनधरणी करण्यात आली. मात्र, केवळ उदासीनतेमुळे या पुलाचा प्रश्न अडगळित पडला आहे. परिणामी पावसाळ्याच्या कालावधीत तीन तालुक्यातील नागरिकांना या नाल्यावरील जीवघेणा प्रवास अद्यापही कायम आहे.
जिल्हास्थळी पोहचण्याचा शॉर्टकट मार्ग देवदा नाला एटापल्ली, मुलचेरा, चामोर्शी तालुक्याच्या सीमेवरुन वाहतो. अशात एटापल्ली तालतुक्यातील नागरिकांना चामोर्शी किंवा जिल्हास्थळ असलेले गडचिरोली गाठण्यासाठी हा शॉर्टकट मार्ग ठरतो. परिणामी एटापल्लीसह मुलचेरा तालुक्यातील नागरीक याच मार्गाने चामोर्शीवरुन जिल्हा मुख्यालयी पोहचतात. मात्र, देवदा नाल्यावर मागील अनेक वर्षापासून पुलाची मागणी होत असतांना याप्रती प्रशासकीय यंत्रणेने उदासीनता बाळगल्याने नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.