दि. २६.०७.२०२३
"आदिवासी गौरव प्रवास अनुभवातून नेतृत्व" या सात दिवसीय कार्यशाळेचा गोंडवाना विद्यापीठात समारोप
- वर्ग खोल्यातून घेतलेले शिक्षण आणि प्रत्यक्ष अनुभवातून घेतलेले शिक्षण वेगळे असते : - कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांतील दुर्गम भागात सामाजिक प्रकल्पांचा अनुभव, त्या भागाचा सांस्कृतिक वारसा, ग्रामीण लोकांची स्थिती तसेच आदिवासी लोकांच्या जीवनावर विविध स्वयंसेवी संस्थांचा प्रभाव या विषयी जवळून जाणून घेता यावे यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. वर्ग खोल्यातून घेतलेले शिक्षण आणि प्रत्यक्ष अनुभवातून घेतलेले शिक्षण हे वेगळं असते असे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी केले.
गोंडवाना विद्यापीठ आणि महाराष्ट्र राज्य विद्याशाखा विकास प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने "आदिवासी गौरव प्रवास अनुभवातून नेतृत्व" या विषयावर सात दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेच्या समारोपाप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
या कार्यशाळेचा समारोप नुकताच गोंडवाना विद्यापीठात पार पडला.
यावेळी गोंडवाना विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, रासेयो संचालक डॉ.श्याम खंडारे, महाराष्ट्र राज्य विद्याशाखा विकास प्रबोधिनी च्या सह-समन्वयक सुजाता वरदराजन, प्रा. डॉ. रुपेंद्रकुमार गौर, कार्यशाळेचे समन्वक डॉ. प्रफुल्ल विठ्ठलराव नांदे आणि १७ प्राध्यापक तसेच प्राचार्य प्राध्यापकांची उपस्थिती होती .
या ठीकाणी झाली सात दिवसीय कार्यशाळा
१६जुलै रोजी आनंदवन वरोरा येथे कार्यशाळेचे उद्घाटन झाले. त्यानंतर आंनदनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मृणाल काळे यानी आनंदवनाविषयी तसेच कोरोना काळात केलेल्या वृक्षारोपण या विषयी माहिती दिली तसेच १७ जुलै ला आनंदवनातील प्रमोद बक्षी यांनी तेथे सुरू असलेले उपक्रम या विषयी माहिती दिली.
१८जुलै ला सोमनाथ प्रकल्प, १९ जुलै रोजी मेंढालेखा येथे देवाजी तोफा यानंतर डॉ. कुंदन दुपारे यांनी गौणवनउपज, तर डॉ. रुपेंद्रकुमार गौर यांनी एकल प्रकल्प, २०जुलै रोजी सर्च प्रकल्प विषयी महेश देशमुख,ज्ञानेश्वर पाटील, अदिती पिदूरकर यांनी 'निर्माण' प्रोजेक्ट, तुषार खोरगडे यांनी सर्च च्या स्थापनेपासून ची माहिती दिली. आणि डॉ.अभय बंग यांच्याशी सहभागी प्राध्यापक आणि प्राचार्य यांनी संवाद साधला.
२१जुलै रोजी महाराष्ट्र राज्य विद्याशाखा विकास प्रबोधिनी च्या सह-समन्वयक सुजाता वरदराजन यांनी फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम या विषयी मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेतील सहभागिनी समाधान व्यक्त करत सात दिवसीय कार्यशाळे विषयी आपले अनुभव कथन केले.