दि. १२.०७.२०२३
Vidarbha News India
Washim Heavy Rain : कोयाळी परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस; शेतात पाणी साचल्याने नुकसान.!
विदर्भ न्यूज इंडिया
वाशिम : वाशिम जिल्ह्यात आज दुपारी काही भागात जोरदार पावसाने हजेरी लावली. तर काही भागात रिमझिम (Washim) पाऊस झाला. मात्र रिसोड तालुक्यात अनेक भागात मुसळधार पाऊस (Heavy Rain) बरसला असून कोयाळी परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस बरसल्याने परिसरातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
राज्यातील अनेक भागात पाऊस सक्रीय झाला आहे. यात काही भागामध्ये मुसळधार पाऊस होत आहे. दरम्यान वाशिम जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने आज दुपारच्यावेळी जोरदार हजेरी लावली. यात कोयाळी परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने मोठे नुकसान झाल्याचे पहावयास मिळत आहे.
पिकांचे मोठे नुकसान
ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने परिसरातील ओढ्यानाल्यांना पूर आला असून शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. यामुळे नुकताच खरिपाची पेरणी केलेले सोयाबीन पीक आणि गेल्या महिन्यात लागवड केलेल्या हळदीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आधीच उशिरा पाऊस झाल्याने पेरणी उशिरा झाली होती. त्यामुळे खरिपाच उत्पन्न घट की काय, अशी चिंता सतावत असताना आता ढगफुटी सदृश्य पाऊस पडल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.