दि. ६ जुलै २०२३
Vidarbha News India
Maharashtra Political Crisis : राजकीय घडामोडींना वेग! मुख्यमंत्र्यांचा गडचिरोली दौरा रद्द तर उद्धव ठाकरेंनी कसली कंबर
विदर्भ न्यूज इंडिया
मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या अनेक गोष्टी घडत आहेत. शिवसेनेपाठोपाठ आता राष्ट्रवादी पक्षातही फूट पडली आहे. शरद पवार विरुद्ध अजित पवार असे दोन गट तयार झाले आहेत. दुसरीकडे मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत.
आता शरद पवार आणि सुप्रिया सुळे राष्ट्रीय कार्यकारीणीसाठी दिल्लीला रवाना झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज गडचिरोली दौऱ्यावर होते. मात्र त्यांनी अचानक दौरा रद्द केल्याची माहिती मिळाली आहे. राज्यातील बदललेल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर दौरा रद्द केल्याची चर्चा आहे. मात्र नेमकं कारण अजूनही समोर आलं नाही. गडचिरोली 'शासन आपल्या दारी' कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज गडचिरोलीमध्ये उपस्थित राहणार होते. तर पावसामुळेही दौरा रद्द झाला असण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौऱ्याच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा पहिल्या टप्प्यातील महाराष्ट्र दौरा विदर्भातून, भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या नागपुरात 10 जुलैला उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. नऊ आणि दहा जुलैला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा यवतमाळ वाशिम अमरावती अकोला नागपूर दौऱ्यावर असतील अशी माहिती मिळाली आहे. 9 जुलैला पोहरादेवीचे दर्शन घेऊन उद्धव ठाकरे आधी यवतमाळ जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतील त्यानंतर वाशिम जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची चर्चा करणार. त्याच दिवशी यवतमाळ वाशिम जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी उद्धव ठाकरे संवाद साधणार.
10 जुलैला अमरावती अकोला जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार. अमरावतीनंतर उद्धव ठाकरे नागपूर आत जाऊन नागपूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची 10 जुलै रोजी संवाद साधून पक्ष संघटनेची ताकद वाढवण्यासाठी कार्यकर्त्यांना सूचना देणार.
राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट सत्तेत गेल्यानंतर सध्याच्या राज्यातील राजकीय घडामोडी पाहता उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र दौरा कळत पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. उद्धव ठाकरेंसह ठाकरे गटाचे महत्त्वाचे नेते महाराष्ट्रातील विविध ठिकाणी जाऊन कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार. या दौऱ्यांची सुरुवात विदर्भातून केली जाणार आहे.