दि. १ जुलै २०२३
Vidarbha News India
Nagpur Pune Bus Accident: समृद्धी महामार्गावरील भीषण अपघातानंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Devendra Fadnavis News:
विदर्भ न्यूज इंडिया
नागपूर : समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर विदर्भ ट्रॅव्हल्सचा शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास भीषण अपघात झाला.
'बुलढाण्याचा अपघातात मानवी चूक देखील असू शकते किंवा टायर फुटल्याने देखील अपघात होऊ शकतो, अशी शक्यता देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. (Latest Marathi News)
समृद्धी महामार्गावरुन ही बस नागपूरहून पुण्याच्या दिशेने निघाली होती. बस बुलढाण्याजवळ आल्यानंतर डिव्हायडरला धडकून पेट घेतला. या भीषण अपघातावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, पहाटेच्या समयी एक दुर्दैवी अपघात झाला आहे. एक बस पुलावर कोसळली आहे. डिझेल टाकी फुटून आग लागली आहे . या अपघातात २५ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर या अपघातातून ८ लोक थोडक्यात बचावले आहेत. ८ जणांपैकी कोणीही गंभीर नाही'.
'२५ जणांचे मृतहेद जळालेले आहेत. हे मृतदेह ओळखण्यासाठी टेस्ट करावी लागेल. मृतकांच्या परिवाराला ५ लाखांची मदत केलेली आहे. जखमींचा खर्च सरकार करणार आहे, असे फडणवीसांनी जाहीर केले.
'दुर्घटनेची चौकशी सुरू आहे. अपघातात मानवी चूक देखील असू शकते किंवा अपघात टायर फुटल्याने देखील होऊ शकते. आता यावर बोलणे योग्य नाही. आता आम्ही घटनास्थळी जात आहोत, असे फडणवीस म्हणाले.
शरद पवार यांनी या अपघातानंतर ट्विट करत उपाययोजना करण्याच्या सूचना करत मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे. शरद पवारांच्या ट्विटवर देवेंद्र फडणवीस म्हणाले, ' आपण उपाययोजना करत आहोत. अपघात होणार नाही, याबाबत आपण स्मार्ट सिस्टीम आपण बसवत आहोत,त्याला वेळ लागेल. पण चालकांचे प्रबोधन करावे लागेल. जास्त वेगाने लोक वाहन चालवतात, त्यामुळे अपघात होतात. प्रबोधन देखील करणे गरजेचे आहे'.
शरद पवार काय म्हणाले?
शरद पवार यांनी ट्विट करत बुलढाण्यातील मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे. शरद पवार म्हणाले, 'बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा पिंपळखुटा भागात समृध्दी महामार्गावर लक्झरी बस उलटून भीषण अपघात झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या अपघातात 25 प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली. अपघातातील जखमींवर लवकरात लवकर उपचार होऊन ते बरे व्हावेत ही प्रार्थना'.
'या दुर्दैवी घटनेमुळे समृद्धी महामार्गावरील खासगी वाहनांच्या वेगमर्यादेचा प्रश्न उपस्थित होत असून याबाबत राज्य सरकारने गंभीर दखल घेत त्वरित उपाययोजना करायला हव्यात. एक आठवड्यापूर्वीच संबंधित विभागाकडून होत असलेल्या अपघातांची आकडेवारी मागवून चिंता व्यक्त केली होती. अपघात रोखणाच्या दृष्टीने तातडीच्या उपाययोजना कराव्यात असे सुचवले होते, असे शरद पवार म्हणाले.