दि. ०६.०८.२०२३
गोंडवाना विद्यापीठात राष्ट्रीय स्तरावरील नाट्य प्रशिक्षण कार्यशाळा उद्घाटन संपन्न...
- नट हा शेवटपर्यंत विद्यार्थी असतो - : पद्मश्री डॉ.परशुराम खुणे
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : नाट्य अभिनयाची ही गंगा प्रशिक्षणाच्या माध्यमातून गडचिरोलीत आणली. चांगले जाणकार प्रशिक्षक विद्यार्थ्यांसाठी इथे आले आहेत. प्रत्येकात एक कलाकार दडलेला असतो. त्यासाठी भाषेवर प्रभुत्व असणं आवश्यक असते. तुमच्यात असलेले सुप्त गुण हे प्रशिक्षक बाहेर काढतील. कलावंत हा शेवटपर्यंत विद्यार्थी असतो असे प्रतिपादन जेष्ठ झाडीपट्टी कलावंत पद्मश्री डॉ. परशुराम खुणे यांनी केले. गोंडवाना विद्यापीठात निशुल्क राष्ट्रीय स्तरावरील नाट्य प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते नूकतेच पार पडले. या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठाचे प्र- कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन, झाडीपट्टी कलावंत मनोहर हेपट, आईस बालाजी इन्स्टिट्यूट मुंबईच्या लक्ष्मी रावत, कार्यशाळेच्या संचालिका संगीता टिपले तसेच नाट्य कलावंत कार्यशाळा समन्वयक अनिरुद्ध वनकर उपस्थित होते.
या प्रसंगी प्र-कुलगुरू डॉ. कावळे म्हणाले, येथील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे हे विद्यापीठाचे कर्तव्य आहे. या प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या ३० विद्यार्थ्यांनी या संधीचे सोने करावे.
येथील मुलांमध्ये खूप पोटेन्शिअल आहे या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन विद्यार्थ्यांनी स्वतःला सिद्ध करावे असे मत कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन यांनी व्यक्त केले.
भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, नवी दिल्ली आणि लोकजागृती संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने तथा गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या सहकार्याने ४ सप्टेंबरपर्यंत एक महिन्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
आईस बालाजी इन्स्टिट्यूट मुंबईच्या लक्ष्मी रावत, कार्यशाळेच्या संचालिका राष्ट्रीय नाट्य विद्यालय नवी दिल्लीच्या संगीता टिपले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. संचालन प्रशिक्षणार्थी विद्यार्थी सुरज चौधरी यांनी, तर प्रास्ताविक आणि आभार अनिरुद्ध वनकर यांनी केले.
या कार्यशाळेसाठी चंद्रपूर व गडचिरोली शहरात ऑडीशन घेण्यात आले होते. यामध्ये २०० कलावंतांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी ३० गुणी व होतकरू कलावंतांची निवड करण्यात आली. या कलावंतांना नॅशनल स्कुल ऑफ ड्रामा दिल्लीचे तज्ञ, प्राध्यापक व रंगकर्मी अभिनय व थिएटरचे धडे देणार आहेत. त्यानंतर एका महिन्याच्या कार्यशाळेतून 30 विद्यार्थ्यांचे एक नवीन नाटक तयार होणार आहे.