दि. १८.०८.२०२३
'एकात्म मानववाद' अध्यासनाचे उद्घाटन ठरल्याप्रमाणे १९ ऑगस्टला होईल
• गोंडवाना विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचा एकमताने निर्णय...
• विविध विचारांचे अध्यासन करण्यात विद्यापीठ कटिबध्द...
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : 'पं. दीनदयाल उपाध्याय एकात्म मानववाद' या अध्यासनाचा उद्घाटन कार्यक्रम शनिवार, १९ ऑगस्ट रोजी होऊ घातला असताना, या अध्यासनाच्या विरोधात व समर्थनात काही निवेदने गोंडवाना विद्यापीठाला प्राप्त झालीत. त्यावर व्यवस्थापन परिषदेच्या १८ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता आयोजित बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. चर्चेअंती, पं. दीनदयाल उपाध्याय एकात्म मानववाद' या अध्यासनाचा कार्यक्रम ठरल्याप्रमाणे १९ ऑगस्ट रोजी होईल, असा एकमताने निर्णय घेण्यात आला आहे.
गोंडवाना विद्यापीठाने दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात नमूद आहे की, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील ७ व्या कलमान्वये, 'स्त्रि-पुरूष भेद, वंश, पंथ, वर्ग, जात, जन्मस्थान, धर्म किंवा मतप्रणाली इत्यादी विचारात न घेता विद्यापीठ सर्वांना खुले आहे'. शिवाय, 'वेगवेगळे धर्म, साहित्य, इतिहास, विज्ञान, एकात्मता, बंधुता वाढीस लावणे', हेही विद्यापीठाचे उद्दीष्टय आहे. याच अनुषंगाने 'पं. दीनदयाल उपाध्याय एकात्म मानववाद' या अध्यासनाला अधिसभेत एकमताने मंजूरी मिळाली. पुढे विद्या परिषद व व्यवस्थापन परिषदेनेही या अध्यासनाला मंजूरी दिली. शासनाकडूनही अध्यासनासाठी निधी देण्यात आला. हा निर्णय अधिसभेने घेतला असल्याने आणि अधिसूचनेप्रमाणे, अधिसभेच्या संमतीशिवाय कोणताही पारित प्रस्ताव मागे घेतला जाऊ शकत नसल्याने या अध्यासनाचा कार्यक्रम आता थांबवता येत नाही.
तसेही सर्व विचारांचे स्वागत करणे आणि सिनेटमध्ये पारित विषयाची अमलबजावणी करणे विद्यापीठ प्रशासनाचे कर्तव्य असल्याने हे अध्यासन व त्याच्या उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे. मात्र, त्याचवेळी विद्यापीठाच्या सिनेटमध्ये पारित अन्य सर्वच अध्यासनांची अंमलबजावणी करण्याचे कामही विद्यापीठ करीत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्र मंजूर झाले आहे. त्याचे उद्घाटनही थाटात पार पडले जगद्गुरू तुकाराम महाराज अध्यासन, क्रांतीवीर बिरसा मुंडा आदिवासी संस्कृती अध्यासन, म. ज्योतिबा फुले अध्यासन, सत तुकाराम महाराज अध्यासन, महाकवी वामनदादा कर्डक अध्यासन आदी विविध अध्यासनांच्या अंमलबजावणीचे काम सुरू आहे. त्यासाठी विद्यापीठ कटीबध्द आहेच.
त्यामुळे 'पं. दीनदयाल उपाध्याय एकात्म मानववाद' अध्यासनाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम शांततेत व उत्साहात पार पाडावा, असे आवाहन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशान्त बोकारे यांनी केले आहे. शनिवार, सकाळी ११ वाजता आयोजित या कार्यक्रमाला पत्रिकेशिवाय प्रवेश मिळणार नाही, असेही प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.