दि. २८.०८.२०२३
जांभळी कारवाफा रस्त्यावरील पुलाचे बांधकाम निकृष्ट ; आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी केली चौकशीची व दोषींवर कारवाईची मागणी
- नाबार्डच्या माध्यमातुन बांधलेल्या निकृष्ट दर्जाच्या पुलाच्या बांधकामाची केली पाहणी
- पूलाची डिझाईन कंत्राटदाराच्या लाभासाठी करण्यात आल्याने काम निकृष्ट..!
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : वर्षभरापूर्वीच जांभळी कारवाफा रस्त्यावरील नवेगाव कारवाफा नाल्यावर नाबार्डच्या माध्यमातून बांधण्यात आलेल्या पुलाजवळील रस्ता पाण्यामुळे वाहून गेला असून आणखी काही दिवस पूर असता तर पुलही वाहून गेला असता अशा पद्धतीने या पुलाचे निकृष्ट बांधकाम करण्यात आलेले आहे. त्यामुळे सदर पुलाच्या बांधकामाची व पुला लगतच्या रस्त्याच्या बांधकामाची तातडीने चौकशी करून त्यातील दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी या पुलाची व खचलेल्या रस्त्याची पाहणी करताना केली.
आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांनी या पुलाची सभोवताल पाहणी करून सदर पुलाच्या बांधकामाचे डिझाईन हे कंत्राटदाराला लाभ मिळवून देण्याच्या उद्देशाने करण्यात आले असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे अशा प्रकारचे डिझाईन, नकाशे तयार करून निकृष्ट बांधकाम करणाऱ्या कंत्राटदारांवर व अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले.