सातबारा उताऱ्यावर करा ऑनलाईन दुरुस्ती; एक ऑगस्ट पासून राज्यात मोहीम सुरू - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

सातबारा उताऱ्यावर करा ऑनलाईन दुरुस्ती; एक ऑगस्ट पासून राज्यात मोहीम सुरू

दि. २२.०८.२०२३

Vidarbha News India

सातबारा उताऱ्यावर करा ऑनलाईन दुरुस्ती; एक ऑगस्ट पासून राज्यात मोहीम सुरू

विदर्भ न्यूज इंडिया

पुणे : सातबारा उताऱ्यावरील नाव, क्षेत्रांमध्ये झालेली चूक बदलण्याची मोहीम राज्यभर सुरू करण्यात आली असून, त्यासाठी जमीनमालकांना आता ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. १ ऑगस्टपासून सुर झालेल्या या मोहिमेत आतापर्यंत ७ हजारांहून अधिक अर्ज आले आहेत.

यात सर्वाधिक १ हजार ३४० अर्ज पुणे जिल्ह्यातून आले आहेत. आलेल्या अर्जांबाबत सुनावणी घेऊन त्यातील बदलांबाबत तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश सर्व तहसीलदारांना देण्यात आले आहे. जिल्हाधिकारी देखील या प्रक्रियेवर लक्ष ठेवून असतील.

याबाबत जमाबंदी आयुक्तालयाने सातबारा उतारे दुरुस्तीचा प्रस्ताव दिला होता. त्याला मान्यता मिळाल्यानंतर हिंप्रक्रिया सुरू झाली आहे. राज्यात आजवर दोन कोटी ६२ लाख सातबारा उतारे तयार आहेत. त्यात संगणकावर टायपिंग करताना किंवा पूर्वी हाताने लिहिताना चुका होण्याची शक्यता अधिक असते. त्यातील चुका झाल्यास त्या दुरुस्त करता येणे शक्य आहे. चुका झालेल्या किंवा दुरुस्ती राहून गेलेले सातबारा उतारे दुरुस्ती करण्याचे अधिकार तहसीलदारांना दिले आहेत.

अशी होणार दुरुस्ती

सातबारा उतारा दुरुस्तीसाठी आलेले अर्ज तहसीलदारांच्या पातळीवर प्रलंबित असून ते लिखित स्वरूपात असल्याने प्रलंबित राहिले आहेत. आता ऑनलाइन पद्धतीने दिलेले अर्ज किती स्वरूपात प्रलंबित आहेत, याचे रेकॉर्ड ठेवणे शक्य आहे. त्यामुळे नागरिकांनी 'ई हक्क' पोर्टलवरून सातबारा-फेरफार यावर क्लिक करून तेथे अर्ज करावा. त्या अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत. त्यानंतर हा अर्ज संबंधितांकडे गेल्यानंतर तलाठी संबंधित कागदपत्रांचे पुरावे तपासून, त्याची पूर्तता करणार आहे. ती दुरुस्ती तहसीलदारांकडे मान्यतेसाठी पाठविली जाईल.

राज्यात आतापर्यंत आलेले अर्ज जिल्हानिहाय

अकोला ३०, अमरावती १२७, बुलढाणा १११, यवतमाळ ८१, वाशिम ५३, धाराशिव १६५, संभाजीनगर ३३२, जालना १६९, नांदेड ७८, परभणी २७०, बीड ८४, लातूर १२५, हिंगोली १९, ठाणे १२६, पालघर १३४, मुंबई उपनगर १, रत्नागिरी ३२१, रायगड १७८, सिंधुदुर्ग १४७, गडचिरोली २५, गोंदिया ४५, चंद्रपूर ५६, नागपूर १४८, भंडारा ५९, वर्धा १२९, नगर ४८०, जळगाव १९१, धुळे १२६, नाशिक ३१८, नंदुरबार ४८, कोल्हापूर ३१९, पुणे १३४०, सातारा ४६५, सांगली ४३३, सोलापूर ३५५ एकूण ७१४८.

ऑफलाइन अर्जांची ऑनलाइन एंट्री

राज्यात आतापर्यंत सुमारे पाच लाख अर्ज दुरुस्तीसाठी प्रलंबित आहेत. त्यापैकी एक लाख पाच हजार ११९ अर्ज ऑनलाइन पद्धतीने आले आहेत. त्यातील ५९ हजार २३० अर्ज स्वीकारण्यात आले आहेत. ३९ हजार ६६० अर्ज हे त्रुटींची पूर्तता करण्यासाठी प्रलंबित आहेत. सहा हजार २२९ अर्ज तलाठ्यांकडे प्रलंबित आहेत. त्यामुळे राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये सातबारा दुरुस्तीच्या अर्जांचा आढावा घेण्याची सूचना सर्व जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली आहे. ऑफलाइन अर्जांची आता ऑनलाइन एंट्री करण्याची सूचनाही देण्यात आली आहे.

नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळतोय

महसूल सप्ताह निमित्त हस्तलिखित व संगणकृत सातबारा उताऱ्याच्या दुरुस्तीची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. याला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. आलेल्या अर्जांवर तातडीने सुनावणी घेऊन निर्णय द्यावा असे निर्देश सर्व तहसीलदारांना दिले आहेत. या प्रक्रियेची जिल्हाधिकारी स्तरावर देखील नोंद ठेवली जाणार आहे. त्यामुळे या प्रक्रियेला वेग येईल. - सरिता नरके, राज्य संचालक, माहिती तंत्रज्ञान, महसूल विभाग


Share News

copylock

Post Top Ad

-->