दि. १७.०८.२०२३
Vidarbha News India
Swadhar Yojana: उच्च शिक्षणासाठी सरकार देत आहे 43 हजार, जाणून घ्या काय आहे 'स्वाधार' योजना...
Dr. Babasaheb Ambedkar Swadhar Yojana:
विदर्भ न्यूज इंडिया
अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिक्षण घेता यावे, यासाठी सामाजिक न्याय विभागाच्यावतीने शासकीय वसतिगृहे कार्यरत आहेत.
विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता यावे यासाठी सामाजिक न्याय विभागातर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेमुळे अनुसूचित जाती व नवबौद्व प्रवर्गातील अनेक होतकरु विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षणाचे स्वप्न पूर्ण होत आहे. (Utility News in Marathi)
इयत्ता 11 वी, 12 वी तसेच इयत्ता 12 वी नंतरचे व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम तालुका किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी उपलब्ध असतात. या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना शहरातील महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागतो. महाविद्यालयात प्रवेश मिळाल्यानंतर मर्यादित जागांमुळे शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळेलच याची शाश्वती नसते. (Latest Marathi News)
वसतिगृहात प्रवेश न मिळाल्यास विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश मिळून देखील उच्च शिक्षणापासून वंचित रहावे लागते. विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे स्वप्न भंग होऊ नये यासाठी विद्यार्थ्यांना भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा स्वतः उपलब्ध करुन घेण्यासाठी आवश्यक रक्कम राज्य शासनाच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेतून विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट जमा करण्यात येते.
मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर याठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 32 हजार रुपये भोजन भत्ता, 20 हजार रुपये निवास भत्ता आणि 8 हजार रुपये निर्वाह भत्ता असे एकूण 60 हजार रुपये दरवर्षी दिले जातात. इतर महसूल विभागीय शहरातील व उर्वरित क वर्ग महानगरपालिका क्षेत्रातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 28 हजार रुपये भोजन भत्ता, 15 हजार रुपये निवास भत्ता आणि 8 हजार रुपये निर्वाह भत्ता असे एकूण 51 हजार रुपये दरवर्षी आणि उर्वरित ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 25 हजार रुपये भोजन भत्ता, 12 हजार रुपये निवास भत्ता, 6 हजार रुपये निर्वाह भत्ता असे एकूण 43 हजार रुपये रक्कम विद्यार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा केली जाते. या व्यतिरिक्त वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी 5 हजार रुपये आणि इतर शाखेतील विद्यार्थ्यांना 2 हजार रुपये शैक्षणिक साहित्यासाठी ठोक स्वरुपात दिले जातात.
योजनेसाठी पात्रता
अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जातो. विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे. त्याने जात प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. विद्यार्थ्याने कोणत्याही शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज केल्यानंतर शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळालेला नसावा. शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी पात्र असलेल्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जातो. विद्यार्थ्यास इयत्ता दहावी, अकरावी, बारावी, पदविका, पदवीमध्ये किमान 50 टक्केपेक्षा जास्त गुण असणे अनिवार्य आहे. या योजनेमध्ये दिव्यांग (अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील) विद्यार्थ्यांसाठी 3 टक्के आरक्षण असून गुणवत्तेची मर्यादा 40 टक्के आहे.
विद्यार्थ्यांच्या पालकाचे उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. तसेच विद्यार्थ्याने ज्या महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे, तेथील तो स्थानिक रहिवाशी नसावा. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महानगरपालिका क्षेत्रामध्ये असलेली महाविद्यालये तसेच महानगरपालिका हद्दीपासून पाच किलोमीटर परिसरात असलेली यामध्ये शिक्षण घेत असलेल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनीच अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेला अभ्यासक्रम दोन वर्षापेक्षा कमी कालाधीचा नसावा. तसेच विद्यार्थ्याची महाविद्यालयातील उपस्थिती 75 टक्केपेक्षा जास्त असणे बंधनकारक आहे. विद्यार्थ्याची निवड गुणवत्तेच्या आधारे करण्यात येते. या योजनेसाठी खास बाब सवलत लागू नाही.
अर्जासाठी संपर्क
सन 2023-24 या शैक्षणिक वर्षासाठी या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित विद्यार्थी ज्या जिल्ह्यामध्ये शिक्षण घेत आहे, त्या जिल्ह्याच्या सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांच्याकडे ऑनलाईन पोर्टलद्वारे अर्ज सादर करावेत.
अनुदान वितरणाची पद्धत
सहायक आयुक्त समाज कल्याण हे अर्जाची छाननी करतील व त्यांची गुणवत्ता यादी जिल्हानिहाय तयार करुन पात्र लाभार्थ्यांना त्याने घेतलेल्या प्रवेशाचे जिल्ह्यातील जवळचे मागासवर्गीय मुलां/मुलींचे वसतिगृहाशी संलग्न करतील. शैक्षणिक वर्षामध्ये विद्यार्थ्यांनी सबंधित शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेतल्यानंतर या योजनेंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना अनुज्ञेय रक्कमेपैकी पहिल्या सहामाहीची रक्कम आधार संलग्न खात्यावर आगावू जमा करण्यात येते. पात्र विद्यार्थ्यास भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती अंतर्गत प्राप्त होत असलेल्या निर्वाह भत्त्याची रक्कम वजावट करुन उर्वरित निर्वाह भत्ता, भोजन भत्ता, निवास भत्ता याची रक्कम दिली जाते. विद्यार्थ्यांची महाविद्यालयातील उपस्थिती 75 टक्के असल्याचे सबंधित संस्थेचे प्रत्येक सहामाही उपस्थिती प्रमाणपत्र ऑनलाईन पोर्टलद्वारे सादर करणे बंधनकारक आहे. महाविद्यालयातील 75 टक्केपेक्षा अधिक उपस्थिती असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दुसऱ्या हप्त्याची रक्कम विद्यार्थ्यांच्या आधारसंलग्न खात्यावर जमा करण्यात येते.