दि. ०५.०९.२०२३
Vidarbha News India
एका महिन्याच्या निःशुल्क नाट्य प्रशिक्षणातून ३० विद्यार्थ्यांनी साकारले क्रांतीविर बाबुराव शेडमाके नाटक
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा नवी दिल्ली, लोकजागृती संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने तथा गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या सहकार्याने एक महिन्याची निःशुल्क कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
या कार्यशाळेसाठी चंद्रपूर व गडचिरोली शहरात ऑडीशन घेण्यात आले होते. यामध्ये २०० कलावंतांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी ३० गुणी व होतकरू कलावंतांची निवड करण्यात आली. या कलावंतांना नॅशनल स्कुल ऑफ ड्रामा दिल्लीचे तज्ञ, प्राध्यापक व रंगकर्मी यांनी अभिनय व थिएटरचे धडे दिले. त्यानंतर एका महिन्याच्या कार्यशाळेतून ३० विद्यार्थ्यांचे एक नवीन नाटक नुकतेच सादर करण्यात आले.
अभिनय लॉन गडचिरोली येथे क्रांतीविर बाबुराव शेडमाके या नाटकाचा प्रयोग निःशुल्क करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण होते. तर प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी , माजी नगराध्यक्ष ऍड. राम मेश्राम, डॉ. सचिन मडावी, माधवराव गावड, कवि वसंतराव कुलसंगे, माजी सभापती मारोतराव ईचोळकर, डॉ. शेखर डोंगरे सामाजीक कार्यकर्ता प्रा. मुनिश्चर बोरकर, कार्यशाळेच्या संचालिका संगिता टिपले आदी उपस्थित होते.
क्रांतीविर बाबुराव शेडमाके नाटकातून बाबुराव शेडमाके यांचा इतिहास, त्यांचे बलिदान जनमानसापर्यत पोहचतील असे विचार आ.डॉ. देवराव होळी यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी म्हणाले की , वीर बाबुराव शेडमाके हे नाटक आदिवासींचे भुषण आहे.
सदर नाटक हे जिल्हयातच नव्हे तर संपुर्ण महाराष्ट्रात गाजले पाहीजे यासाठी शासनाने प्रयत्न करावा. याप्रसंगी एड. राम मेश्राम यांनीही आपले विचार व्यक्त केले. अध्यक्षस्थाना वरून बोलताना कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण म्हणाले की, अनिरुद्ध वनकर सहीत ३० कलाकाराचा हा संच संपूर्ण एक महिना मेहनत घेऊन गोंडवाना विद्यापिठाच्या सहकार्याने निःशुल्क नाटक सादर केले. या साठी विद्यार्थ्यांचा असलेला उत्साह वाखाणण्याजोगा आहे. यापुढेही गोंडवाना विद्यापिठाचे सहकार्य लाभेल.असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. प्रास्ताविक नाट्यकलावंत व दिग्दर्शक अनिरुद्ध वनकर यांनी केले. या नाट्यप्रशिक्षणास कार्यशाळेच्या संचालिका संगीता टिपले ,लक्ष्मी रावत, अनिरुद्ध वनकर यांनी परिश्रम घेतले.या नाटकाला श्रोत्यांची चांगलीच गर्दी जमली होती. श्रोत्यांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक करत नाटकाची प्रशंसा केली.