दि. ०५.०९.२०२३
Vidarbha News India
Vidarbha Weather Update : विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता ; चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत 'ऑरेंज अलर्ट'.!
Heavy rains :
विदर्भ न्यूज इंडिया
नागपूर : पावसाला पोषक वातावरण होताच मॉन्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. आज (ता. ५) विदर्भात पावसाचा जोर वाढणार असून, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत जोरदार पावसाचा 'ऑरेंज अलर्ट' आहे.
विदर्भ, मराठवाडा, कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस, विजांसह वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाच्या पट्ट्याचा पश्चिम टोक हिमालयाच्या पायथ्याकडे कायम आहे. तर पूर्व टोक दक्षिणेकडे आले असून गोरखपूर, पाटणा, हजारीबाग, बंकुरा, दिघा ते पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. वायव्य उत्तर प्रदेशमध्ये समुद्र सपाटीपासून १.५ ते ३.१ किलोमीटर उंचीवर, ओडिशामध्ये समुद्र सपाटीपासून ४.५ ते ७.६ किलोमीटर उंचीवर, तसेच आंध्र प्रदेश आणि तेलंगणा परिसरावर ४.५ ते ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांच्या स्थिती आहेत. यातच बंगालच्या उपसागरातील संभाव्य कमी दाब क्षेत्रामुळे राज्यात मॉन्सून पुन्हा सक्रिय होत आहे.
सोमवारी (ता. ४) सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस झाला आहे. सकाळपासून वाढलेला चटका, उकाड्यापाठोपाठ दुपारनंतर ढग जमा होत पावसाच्या सरी कोसळत आहेत. आज (ता. ५) पूर विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. विदर्भासह मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसह पाऊस पडण्याचा इशारा आहे. तर उर्वरित राज्यात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
उपसागरात कमी दाब क्षेत्राची शक्यता
ईशान्य बंगालच्या उपसागरात समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. या वाऱ्यांच्या प्रभावामुळे पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात आज (ता. ५) सकाळपर्यंत हवेचे कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. वरील चक्राकार वाऱ्यांपासून उत्तर आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.