दि. १४.०९.२०२३
Vidarbha News India
गडचिरोली : आश्रमशाळेत अध्यापनाच्या नावाखाली सहा आदिवासी विद्यार्थिनींची छेड.!
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम हालेवारा आश्रमशाळेत सहा अल्पवयीन आदिवासी मुलींची शिक्षकाने छेड काढल्याची धक्कादायक घटना १२ सप्टेंबरला घडली. तक्रार प्राप्त हाेताच पोलिसांनी गुन्हा नोंदवून शिक्षकाच्या मुसक्या आवळल्या.
या घटनेने दुर्गम भागातील मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
प्रदीप तावडे असे शिक्षकाचे नाव आहे. तो चंद्रपूर जिल्ह्यातील आहे. हालेवारा येथे शासकीय आश्रमशाळा असून तेथे आदिवासी मुले- मुली निवासी शिक्षण घेतात. दरम्यान, १२ सप्टेंबरला प्रदीप तावडे सहावीच्या वर्गातील मुलींना अध्यापन करत होता. यावेळी त्याने मुलींच्या जवळ जाऊन त्यांच्याशी आक्षेपार्ह वर्तन केले. सहा मुलींच्या बाबतीत हा किळसवाणा प्रकार घडला. दरम्यान, मुलींनी मोठ्या धाडसाने याबाबत पालकांना कळविल्यानंतर कसनसूर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली. त्यानुसार बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा, विनयभंग या कलमान्वये प्रदीप तावडेविरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला. त्यानंतर त्यास पोलिसांनी जेरबंद केले.
तीन दिवसांची पोलिस कोठडी
दरम्यान, १३ सप्टेंबरला आरोपी प्रदीप तावडे यास अहेरी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यास तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. अधिक तपास कसनसूर ठाण्याचे पोलिस करत आहेत.