दि. १ ऑक्टोंबर २०२३
Vidarbha News India
"तुम्ही २० लाख द्या मी ५ कोटी देतो, त्यासाठी फक्त..."; पुण्यातल्या महिलेला करायला लावली अजब गोष्ट!
Pune Crime News:
विदर्भ न्यूज इंडिया
पुणे : पाण्याच्या टाकीत पैसे टाका 20 पट करून देतो असे सांगत पुण्यातील महिलेला 20 लाख रुपयांना गंडा घालण्यात आला. रूममध्ये धूर करून पूजा करतो तसच 20 लाखांचे 12 दिवसात 5 कोटी होतील या अमिषाला महिला बळी पडली.
पुण्यातील मध्यवर्ती असलेल्या नारायण पेठेतील ही घटना आहे. याप्रकरणी 41 वर्षीय महिलेने पुण्यातील विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
तक्रारीवरून तनवीर पाटील, शिवम गुरुजी, सुनील राठोड, आनंद स्वामी अशा 4 जणांवर विश्रामबाग पोलिस ठाण्यात कलम 420 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार महिला रिअल इस्टेटचे काम करतात. या व्यवसायामध्ये अंकितकुमार पांडे हे त्यांचे भागीदार आहेत. अंकीतकुमार पांडे यांची एका व्यवहारात तनवीर पाटील नावाच्या व्यक्तिशी भेट झाली होती. त्यानंतर पांडे यांनी तक्रारदार महिला आणि तनवीर पाटील यांची ओळख करुन दिली. यावेळी तनवीर याने अंकीतकुमार पांडे आणि तक्रारदार महिला यांना एका गुरुजीच्यामाध्यमातून पैसे 20 पट करण्याची कल्पना सांगितली.
तनवीर पाटील याने तक्रारदार महिला आणि अंकीतकुमार पांडे यांनी भोंदूबाबा यांची भेट घडवून आणली. यावेळी भोंदूबाबांचे नाव आनंदस्वामी असे सांगण्यात आले. यावेळी 20 लाखांचे पाच कोटी करतो असे भोंदूबाबांने सांगितले. यावर महिलेने विश्वास ठेवत पैशांची सोय करण्याचे सांगितले. महिलेने आनंद राठी ग्लोबल फायनान्सचे मॅनेजर राजपाल सिंग बलवंतसिंग जुनेजा यांच्याकडून 20 लाख रुपये घेतले.
त्यानंतर जुनेजा आणि अंकितकुमार पांडे हे 13 सप्टेंबरला 20 लाख रुपये घेऊन तक्रारदार महिलेच्या नारायण पेठ येथील घरी गेले. रात्री तनवीर पाटील आणि दोन लोक महिलेच्या घरी गेले. त्या दोन लोकांचे नाव शिवम गुरुजी आणि सुनिल राठोड असे सांगण्यात आले.
शिवम गुरुजी याने 200 लिटरच्या बॅरेलमध्ये वीस लाख रुपये टाकण्यास सांगितले आणि त्यानंतर त्या रूमची लाईट बंद करून त्या ठिकाणी आरोपींनी धूर केला. तक्रारदार महिलेला रूमच्या बाहेर काढले.
त्यानंतर 10 मिनिटानंतर तनवीर पाटील, शिवम गुरुजी, सुनिल राठोड यांनी जुनेजा, अंकीतकुमार पांडे आणि तक्रारदार महिलेला सांगितले की हरिव्दार येथे जाऊन पूजा करतो. पूजा केल्यानंतर 20 लाखाचे 5 कोटी होती. यासाठी 12 दिवसांचा कालावधी लागले.
25 सप्टेंबरला 12 दिवस पूर्ण झाल्यानंतर महिलेने तनवीर पाटील यांना फोन केला. मात्र त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. महिलेला संशय आला त्यांनी पाण्याची टाकी उघडून बघितली तर त्यात पैसे नव्हते. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रारदार महिलेने पोलीस ठाणे गाठले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. (Latest Crime News)