दि. 21.11.2023
Vidarbha News India
Sudden Death : भारतातील तरुणांमध्ये अचानक मृत्यूचं कारण कोरोना लसीकरण नाही; ICMRच्या संशोधनात समोर आलं सत्य!
ICMR on Sudden Deaths Among Young Adults :
विदर्भ न्यूज इंडिया
मुंबई : कोरोना लसीकरणामुळे युवकांमध्ये हार्ट अटॅकने मृत्यू होण्याचं प्रमाण वाढल्याचा आरोप गेले काही महिने करण्यात येत होता. मात्र, आता कोरोना प्रतिबंधक लस आणि या अचानक होणाऱ्या मृत्यूंचा काहीही संबंध नसल्याचं आयसीएमआरने स्पष्ट केलं आहे.
कोरोना महामारीला आळा घालण्यासाठी भारताने जगातील सर्वात मोठं लसीकरण अभियान राबवलं होतं. देशातील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसींचे दोन अब्जांहून अधिक डोस देण्यात आले आहेत. मात्र, यानंतर देशातील तरुणांमध्ये हार्ट अटॅकने मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलं होतं. लसीकरणामुळे हे होत असल्याची शंका व्यक्त करण्यात येत होती. मात्र आता ICMR ने या सर्व शंकांना पूर्णविराम दिला आहे.
संशोधनात समोर आलं सत्य
आयसीएमआरने म्हटलं आहे, की अचानक होणाऱ्या मृत्यूला लस कारणीभूत नाही. तर आधी कोरोना झालेला असणे, मृत्यूपूर्वी 48 तासांमध्ये दारुचं सेवन केलेलं असणे, ड्रग्सचं सेवन किंवा अती-व्यायाम अशा काही कारणांमुळे हे अचानक मृत्यू झाले असण्याची शक्यता या संशोधनात वर्तवण्यात आली आहे.
1 ऑक्टोबर 2021 ते 31 मार्च 2023 या कालावधीमध्ये देशभरातील 47 रुग्णालयांचा अभ्यास करुन हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आले. यामध्ये 18 ते 45 वर्षे वयोगटातील निरोगी व्यक्तींचा देखील समावेश करण्यात आला होता. ज्यांनी कोविड लसीचे दोन डोस घेतले होते, अशा लोकांना अचानक होणाऱ्या मृत्यूचा धोका अगदी कमी असल्याचं यात दिसून आलं.