दि. 28.12.2023
Vidarbha News India
पेट्रोलच्या टाकीत दारुचा स्टॉक, गाडी कशी चालवली? जुगाड पाहून पोलीस चक्रावले.!
विदर्भ न्यूज इंडिया
प्रतिनिधी/गडचिरोली : दारुबंदी असलेल्या जिल्ह्यांमध्ये किंवा राज्यांमध्ये दारुची वाहतूक छुप्या मार्गाने केली जाते. अनेकदा दारु वाहतुकीसाठी वेगवेगळी शक्कल लढवण्यात येते.
महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात दारुबंदी आहे. गडचिरोलीत दारुची वाहतूक करण्यासाठी दोन तरुणांनी चक्क पेट्रोलच्या टाकीचा वापर केल्याचं समोर आलं. पेट्रोलच्या टाकीत तरुणांनी अनेक बाटल्या लपवल्या होत्या.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, दारुबंदी असूनही दारुची वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. चामोर्शी इथं दोन तरुण मोटारसायकलने दारुची वाहतूक करत होते. तेव्हा पोलिसांनी जुन्या आदिवासी मुलींच्या वसतीगृहाजवळ सापळा लावत दोघांना ताब्यात घेतलं. त्यानंतर पोलिसांनी पेट्रोलचा टँक तपासला तर त्यातून दारुच्या बाटल्या निघाल्या. दरम्यान, टँकमध्ये पेट्रोल आहे की नाही, मग गाडी कशी चालवली असा प्रश्न उपस्थित असलेल्यांना पडला.
पोलिसांनी जेव्हा गाडीच्या पेट्रोल टाकीत जर दारू आहे तर गाडी चालते कशी असं विचारलं तेव्हा तरुणांनी जे सांगितलं त्याने धक्काच बसला. पेट्रोल टँक गाडीला मॉडीफाय करून डिक्कीत बनवण्यात आले होते. पेट्रोल पुरवण्यासाठी जोडण्यात येणारी पाइप तिथून इंजिनला जोडली होती. तरुणांनी केलेला जुगाड पाहून पोलीससुद्धा चक्रावले. अवैध दारु वाहतूक प्रकरणी बाईक आणि दारुच्या बाटल्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. या प्रकरणी दोघांवर गुन्हाही दाखल झाला आहे.