दि. 17.12.2023
Vidarbha News India
Nagpur Blast : नागपूर स्फोटात सहा महिलांसह 9 जणांचा मृत्यू; राज्य सरकारकडून पाच लाखांची मदत जाहीर.!
विदर्भ न्यूज इंडिया
प्रतिनिधी/नागपूर : नागपुरातील बाजार गाव येथे सोलार एक्सप्लोझिव्ह कंपनीमध्ये भीषण स्फोट झाल्याची घटना घडली. या कंपनीत दारूगोळा बनवण्याचे काम सुरू असताना हा स्फोट झाला. या दुर्घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाला आहे.
सोलार कंपनी भारतातील अनेक संरक्षण क्षेत्राशी संबंधीत कंपन्यांना दारुगोळा पुरवठा करते. 'एक्सप्लोझिव्ह'मध्ये मोठ्या प्रमाणात केमिकलचा वापर होत असतो. हेच काम करत असताना आज स्फोट झाला. नऊ मृतांमध्ये युवराज चरोदे, ओमेश्वर मछिर्के, मिता युकी, आरती सहारे, श्वेताली मारबते, पुष्पा मनपुरे, भाग्यश्री लोणारे, रुमिता युकी, मोसम पटले यांचा समावेश आहे.
यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केली आहे. "नागपुरातील सोलार इंडस्ट्रीजमध्ये झालेल्या स्फोटात 6 महिलांसह 9 लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी मृतकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे आहे." असे फडणवीस म्हणाले आहेत.
"संरक्षण दलासाठी ड्रोन आणि स्फोटके तयार करणारी ही कंपनी आहे. नागपूर जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांच्याशी सातत्याने संपर्कात असून स्वतः IG, SP, जिल्हाधिकारी घटनास्थळी आहेत. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना 5 लाख रुपये मदत राज्य सरकारतर्फे देण्यात येईल. त्याला मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी मान्यता दिली आहे." असेही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.