आदिवासी भागातील विद्यार्थ्यांनी घेतला हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजाचा अनुभव - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

आदिवासी भागातील विद्यार्थ्यांनी घेतला हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजाचा अनुभव

दि. 21.12.2023 
Vidarbha News India 
आदिवासी भागातील विद्यार्थ्यांनी घेतला हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजाचा अनुभव
- गोंडवाना विद्यापीठाच्या जनसंवाद विभागाचा अभ्यास दौरा.!
विदर्भ न्यूज इंडिया 
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाच्या जनसंवाद विभागातील विद्यार्थ्यांनी नागपुरात पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजाचा अनुभव घेतला. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव  डॉ. अनिल हिरेखण आणि जनसंवाद विभागाच्या समन्वयक डॉ. रजनी वाढई यांच्या मार्गर्शनात या अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी विद्यार्थ्यांच्या बस ला हिरवा झेंडा दाखवून शुभेच्छा देत रवाना केले. या अभ्यास दौऱ्यात विभागातील द्वितीय वर्षाचे विद्यार्थी सहभागी झाले होते.  
या दौऱ्यात विद्यार्थ्यांनी विधानसभा आणि विधानपरिषदेतील प्रेक्षक गॅलरीत बसून सभागृहातील कामकाज प्रत्यक्ष कसे चालते याचा अनुभव घेतला. दोन्ही सभागृहातील आमदार राज्याच्या विविध भागातील प्रश्न कशा प्रकारे मांडतात हे विद्यार्थ्यांना बघता आणि अनुभवता आले. 
दरम्यान राष्ट्रकुल संसदीय मंडळ कक्षात विधिमंडळाचे जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने सर यांच्याशी विद्यार्थ्यांनी संवाद साधला. यावेळी मदाने सरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच विद्यार्थ्यांनी आपले अनुभवही थोडक्यात कथन केले. विधिमंडळाचे सभागृह, विधिमंडळ परिसर, राष्ट्रकुल मंडळ, प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींची धावपळ, राजकीय पक्षांचे कार्यालये, मंत्री, आमदार, अधिकारी आणि कार्यकर्त्यांची रेलचेल विद्यार्थ्यांना बघता आणि अनुभवता आली. यावेळी काही आमदार आणि प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींसोबत विद्यार्थ्यांनी फोटोही काढले. अनेक आठवणी साठवून विद्यार्थ्यांनी निरोप घेतला. या अभ्यास दौऱ्यात विद्यार्थ्यांना अनेक गोष्टींची माहिती मिळाली, कामकाजातील तांत्रिक बाबी कळाल्या, अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली, ज्ञानात भर पडली. त्यामुळे नक्कीच विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षेत्रात आणि आयुष्यात या अभ्यास दौऱ्याची शिदोरी उपयोगी पडेल, यात शंका नाही. या दौऱ्यात जनसंवाद विभागाचे स. प्रा. डॉ. संजय डाफ, स. प्रा. डॉ. चैतन्य शिनखेडे, स. प्रा. डॉ. सरफराज अन्सारी, स. प्रा. रोहित कांबळे, लिपिक योगिता कुंभारे सहभागी झाले होते.

Share News

copylock

Post Top Ad

-->