दि. ११ डिसेंबर २०२३
Vidarbha News India
गडचिरोली जिल्ह्यात दारु निर्मिती कारखाना होणार नाही; - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
विदर्भ न्यूज इंडिया
प्रतिनिधी/नागपूर : दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात मोहफुलांपासून दारू निर्मिती कारखाना होणार नाही, अशी स्पष्ट घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत केली.
गडचिरोली जिल्ह्यात मोहापासून दारुनिर्मिती करणारा कारखाना प्रस्तावित आहे. त्याला ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉ. अभय बंग यांनी विरोध दर्शविला आहे. डॉ. बंग अध्यक्ष असलेल्या जिल्हा दारूमुक्ती संघटनेद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना निवेदन देण्यात आले. आदिवासींचे दारूपासून रक्षण करण्यासाठी जिल्ह्यात मागील ३० वर्षांपासून दारूबंदी आहे.
आदिवासी भागात दारू व्यापार, दारूविक्री नको, असे केंद्र व राज्य शासनाचे अधिकृत धोरण आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय कृती दल स्थापन करून २०१६ सालापासून येथे जिल्हाव्यापी दारू-तंबाखू नियंत्रण पथदर्शी प्रयोग 'मुक्तीपथ' नावाने सुरू आहे. ११०० गावांमधील स्त्रिया गावातील दारू बंद करण्यासाठी संघटित प्रयत्न करीत आहेत.