दि. 2 जानेवारी 2024
Vidarbha News India
भीमा कोरेगाव : विजयस्तंभाला अभिवादनासाठी उसळला जनसागर.!
विदर्भ न्यूज इंडिया
पुणे : कोरेगाव भीमा येथे सोमवारी (दि. 1 जानेवारी 2024 ) 206 वा शौर्यदिन मोठ्या जल्लोषात व उत्साही वातावरणात लाखो अनुयायांच्या उपस्थितीत झाला.
दुपारी दोन वाजता जयस्तंभावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करत अभिवादन करण्यात आले. या वेळी भीम अनुयायांनी 'जय भीम जय भीम' नारे देत जल्लोष व्यक्त केला. जयस्तंभ परिसर तसेच इतर सर्व ठिकाणी पोलिस प्रशासनाच्या उत्तम नियोजनामुळे तसेच त्यांनी अहोरात्र घेतलेल्या कष्टामुळे 206 वा अभिवादन सोहळा शिस्तीत पार पडला.
या वेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, बार्टीचे महासंचालक सुनील वारे, प्रभारी सहपोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, अपर पोलिस आयुक्त रंजन कुमार शर्मा, अरविंद चावरिया, जिल्हा पोलिस अधीक्षक अंकित गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, सामाजिक न्याय विभागाचे सहसचिव दिनेश डिंगळे, अतिरिक्त आयुक्त दिनेश ढोके, समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी, सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी प्रवीण कोरगंटीवार, उपायुक्त रवींद्र कदम पाटील, उपायुक्त वृषाली शिंदे आदी उपस्थित होते.
अनेक मान्यवरांनी केले अभिवादन
सकाळपासूनच अनेक राजकीय नेते, विविध संघटनेचे पदाधिकारी व लाखो अनुयायांनी जयस्तंभास अभिवादन केले. उपमुख्यमंत्री अजित पवार सकाळी 6 वाजताच उपस्थित राहिले. रिपब्लिकन सेनेचे सरसेनापती आनंदराज आंबेडकर, वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर, रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय महासचिव संजीव बोधनकर, प्रदेशाध्यक्ष काकासाहेब खांबळकर, केंद्रीय सामाजिकमंत्री रामदास आठवले, भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद, भीम आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष विनय रतनसिंग, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड, माजी समाज कल्याणमंत्री चंद्रकांत हंडोरे, खा. डॉ. अमोल कोल्हे, क्रांती रेडकर, समीर वानखेडे, गायक आनंद शिंदे, ऑल इंडिया पँथर सेनेचे दीपक केदार, बाप्पू भोसले, जोगेंद्र कवाडे तसेच अनेक राजकीय नेतेमंडळी व पदाधिकारी यांनी जयस्तंभास अभिवादन केले.
पाण्याच्या अभावामुळे अनुयायांचे हाल
शासनाच्या वतीने पिण्याच्या पाण्यासाठी तब्बल 150 टँकर ठेवण्यात आले होते; मात्र रस्त्यापासून जयस्तंभाकडे जाण्यासाठी लागलेल्या भरगच्च रांगा व त्यात कडाक्याचे ऊन यामुळे अनेक अनुयायांना लागलेली तहान सहन करावी लागली. कारण जयस्तंभास अभिवादन करण्यासाठी लागलेल्या रांगेतून टँकरकडे जाणे शक्य नव्हते. काही अनुयायांना यामुळे चक्करदेखील आल्याचे दिसून आले.