दि. 03 फेब्रुवारी 2024
Vidarbha News India
अॅम्ब्युलन्स खरेदी महाघोटाळ्यामागे सत्ताधीशाचा पुत्र, विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप.!
विदर्भ न्यूज इंडिया
मुबंई : राज्यातील अॅम्ब्युलन्स महाघोटाळय़ात सत्ताधीशाच्या पुत्राचा हात असल्याचा गंभीर आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज केला. या प्रकरणी कारवाई न केल्यास मंत्रालयाजवळील गांधी पुतळय़ासमोर लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
मिंधे सरकारच्या आरोग्य विभागांतर्गत 108 आपत्कालीन सेवेसाठी अॅम्ब्युलन्स खरेदी केली जाणार आहे. मात्र त्यासाठी टेंडरचे आकडे दुपटीपेक्षा अधिक फुगवून मोठा घोटाळा करण्यात आला आहे. वडेट्टीवार यांनी आज त्यावरून तोफ डागली. हे टेंडर आता दोन ठेकेदारांना विभागून देण्याची शक्कल लढवली जात आहे. नव्या टेंडरनुसार ठेकेदारास वार्षिक सुमारे 750 कोटी रुपये, तर दहा वर्षांपोटी सुमारे नऊ हजार कोटी दिले जाणार आहेत. प्रत्यक्षात ठेकेदाराची एकावेळची गुंतवणूक फक्त 800 कोटींच्या घरात आहे. मात्र सत्ताधीशाच्या पुत्राने मर्जीतील ठेकेदाराला, मंत्र्याच्या नातेवाईकाला काम देण्यासाठी प्रशासनावर दबाव आणून टेंडरचे आकडे फुगवले, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला.
स्पेनच्या कंपनीची मदत
आर्थिक क्षमता नसलेल्या ठेकेदाराला हे काम देण्यासाठी 'स्पेन'स्थित कंपनीची मदत घेतली जात असल्याचाही गौप्यस्फोट वडेट्टीवार यांनी केला. दोनदा नव्याने टेंडर, तीनदा मुदतवाढ अशी पळवाट शोधून शेवटी हे टेंडर विशिष्ट कंपनीलाच दिले जाणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. टेंडरच्या आयडीचेही गौडबंगाल असून एकाच टेंडरचे दोन आयडी असल्याची माहिती समोर आल्याचेही त्यांनी सांगितले.
Vijay Wadettiwar