दि. 20.02.2024
Vidarbha News India
Gadchiroli IED in Pressure Cooker: गडचिरोलीत घातपाताचा मोठा कट उधळला, पोलिसांनी नष्ट केली प्रेशर कुकरमधील स्फोटकं.!
Gadchiroli Pressure Cooker IED Conspiracy
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : जिल्ह्यात माओवाद्यांच्या कारवाया सुरू असून, गडचिरोली पोलिस दलाने प्रेशर कुकरमध्ये ठेवलेली स्फोटके निकामी करत माओवाद्यांचा घातपाताचा मोठा डाव सोमवारी उधळून लावला.
गोंडरी जंगल परिसराकडे जाणाऱ्या पायवाटेवर मोठ्या प्रमाणावर स्फोटके व इतर साहित्य पुरून ठेवल्याची गोपनीय माहिती कोटगुलचे प्रभारी अधिकारी धनंजय कुलकर्णी यांना मिळाल्यानंतर तपास मोहीम राबविण्यात आली.
कुरखेडा उपविभागाअंतर्गत असलेल्या कोटगुल पोलिस स्थानकापासून पाचशे मीटर अंतरावर असलेल्या पहाडाच्या पायथ्याजवळ हा परिसरा आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात तेथे बीडीडीएस (बॉम्ब शोधक व नाशक पथकाला बोलविण्यात आले.
विविध अत्याधुनिक उपकरणांद्वारे जंगल परिसरात शोध घेत असताना एक संशयास्पद जागा आढळून आली. या ठिकाणी अधिक करून तपासणी केली असता जमिनीच्या आत अंदाजे दीड ते दोन फूट खोल स्फोटक पदार्थांनी भरून असलेला प्रेशर कुकर आढळून आला. या कुकरची बीडीडीएस पथकाकडून तपासणी केली असता त्यामध्ये अंदाजे दोन किलो शक्तीशाली स्फोटके असल्याची खात्री पटल्याने हा पदार्थ घटनास्थळीच नष्ट करण्यात आला.
या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) यतीश देशमुख, अपर पोलिस अधीक्षक (अहेरी) एम. रमेश यांच्या मार्गदर्शनात तसेच कुरखेड्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र भोसले यांच्या नेतृत्वात कोटगुल पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक धनंजय कुलकर्णी, बीडीडीएस पथकाचे प्रभारी अधिकारी मयूर पवार, पोलिस हवालदार पंकज हुलके, पोलिस हवालदार अनंतराव सोयाम, पोलिस अंमलदार सचिन लांजेवार, चालक पोलिस अंमलदार तिम्मा गुरनुले यांनी बजावली. (Latest Marathi news)
पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी या कारवाईत सहभागी जवानांचे कौतुक केले. तसेच माओवादविरोधी अभियान आणखी तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत.