Vidarbha News India:-
VNImedia:-
Maharashtra School Reopen : सोमवारपासून राज्यातील सर्व शाळा सुरु; शिक्षणमंत्र्यांची माहिती
Maharashtra School Reopen : सोमवारपासून राज्यातील सर्व शाळा सुरु करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणमंत्र्यांनी दिली आहे.
Maharashtra School Reopen : सोमवारपासून राज्यातील सर्व शाळा सुरु करण्यास परवानगी देण्यात आल्याची माहिती राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन आणि कोरोनाचे सर्व नियम पाळून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचंही शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव आणि इतर बाबी पाहून स्थानिक प्रशासन शाळा सुरु करण्यासंदर्भातील निर्णय घेऊ शकणार आहेत. त्याबाबतचे सर्व निर्णय स्थानिक प्रशासनाकडे सोपवण्यात आले आहेत. तसेच, राज्यातील शाळा सुरु करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी समंती दिली असल्याचं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड बोलताना म्हणाल्या की, "सर्वच स्तरांतून शाळा सुरु करण्याच्या संदर्भात मागणी होत होती. तसेच, शाळा सुरु करण्यासंदर्भातील अधिकार स्थानिक स्तरावार देण्याची मागणी होत होती. अशातच आजच्या बैठकीत सोमवारपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, सोमवारपासून म्हणजेच, 24 जानेवारीपासून शाळा सुरु करण्याची परवानगी मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. त्यामुळे कोरोनाचे सर्व नियम पाळून शाळा सुरु करण्यात येणार आहेत." पालकांची समंती मिळालेल्या विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला जाणार असल्याचं यावेळी शिक्षणमंत्र्यांनी सांगितलं. स्थानिक परिस्थितीनुसार, बालवाडी ते महाविद्यालय असं संपूर्ण शिक्षण सुरू होणार असल्याचंही वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आणि त्यापासून लहान मुलांना असलेला धोका लक्षात घेता राज्यातील शाळा 15 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला होता. त्यानंतर आता राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या घटत असून त्याचा प्रभावही कमी झाला आहे. त्यामुळे आता शाळा सुरू करण्यात याव्यात अशी मागणी विविध घटकांतून केली जात होती.
कोरोना नियमांचं पालन करुन राज्यातील शाळा सुरू कराव्यात. त्या संबंधी निर्णय घेण्याचा अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आला आहे, असं राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं होतं. राज्यातील विविध समाजघटकांतून शाळा सुरू करण्यात याव्यात अशी सातत्यानं मागणी होत होती. त्यावर विचार करुन तशा प्रकारचा प्रस्ताव आता शालेय शिक्षण विभागाने मुख्यमंत्र्यांकडे पाठवला असल्याचं वर्षा गायकवाड यांनी काल सांगितलं होतं.