युक्रेनमध्ये अडकलेले गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांच्या नातेवाईकांनी 'या' कार्यालयात संपर्क करावे
गडचिरोली : सद्यास्थितीत रशिया व युक्रेन या देशात तणावपुर्ण परिस्थिती निर्माण झाली असून रशिया देशाने युद्ध घोषित केले आहे. या परिस्थितीत युक्रेनमध्ये गडचिरोली जिल्ह्यातील नागरिक अडकले असल्यास तात्काळ सदर नागरिकांचे नातेवाईकांनी जवळच्या पोलीस स्टेशनला संपर्क करुन कळवावे, जेणेकरुन अडकलेले नागरिकांना सुखरुपपणे परत सुरक्षित ठिकाणी आणण्याबाबत कार्यवाही करता येईल. याबाबत गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की, युक्रेनमध्ये अडकलेले त्यांचे नातेवाईकांबाबत तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनला कळवावे किंवा जिल्हा नियंत्रण कक्ष, पोलीस अधिक्षक कार्यालय, गडचिरोली येथे 07132-223149, 07132-223142 किंवा मो.
क्र. 9403801322 या क्रमांकावर संपर्क करुन कळवावे असे नि. उ. जि.तथा मु. का. अ. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, गडचिरोली यांनी कळविले आहे.
गडचिरोलीच्या दोन विद्यार्थिनी अडकल्या युक्रेनमध्ये...
रशियाने युक्रेनविरुद्ध युद्ध पुकारले असतांना गडचिरोली शहरातील दोन विद्यार्थिनी युक्रेनमधील एका शहरात अडकल्या आहेत. यामुळे पालक चिंताग्रस्त झाले आहेत. दिव्यानी सुरेश बांबोळकर आणि स्मृती रमेश सोनटक्के अशी या विद्यार्थिनीची नावे आहेत. दोघीही राजधानीक शहरापासून सुमारे अडीचशे किलोमीटर अंतरावरील व्हिनित्सिया येथील व्हिनित्सिया नॅशनल युनिव्हर्सिटीत एमबीबीएसचे शिक्षण घेत आहेत. दिव्यानी ही एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षाला तर स्मृती प्रथम वर्षाला आहे. दिव्यानी ही आपल्या मैत्रिणींसह व्हिनित्सिया शहरातील एका खोलीत राहते. तर ही वसतिगृहात राहत आहे.
या शहरात तेवढी भीषण परिस्थिती नाही. परंतु गेल्या काही दिवसांपासून युक्रेनवर युद्धाचे सावट असल्याने स्मुर्ती सोनटक्के हिने ४ मार्चच्या विमानाचे तिकिट काढले होते, मात्र युद्ध सुरु झाल्याने सर्व विमाने बंद आहेत. अशातच काल (ता २४) विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी युक्रेनमध्ये नेणाऱ्या कंत्राटदाराने भोजन व अन्य जीवन आवश्यक वस्तूंची साठवणूक करून ठेवण्याचा निरोप या विद्यार्थिनींना दिला. त्यानुसार त्यांनी सर्व वस्तूंची जमवाजमव करून ठेवली आहे.
परंतु परिस्थिती आणखी चिघळत असल्याने आणि विमाने बंद असल्याने वसतिगृहातील सर्व विद्यार्थी भयभीत झाले आहेत. यासंदर्भात विद्यार्थी आणि त्याचे कंत्राटदार भारतीय दुतावासाच्या संपर्कात असल्याची माहिती प्रा. रमेश सोनटक्के यांनी दिली. दोन्ही विद्यार्थिनी सुरक्षित असल्या तरी युद्धामुळे पालक चिंताग्रस्त झाले आहेत.
युद्धाची स्थिती बघता व्हिनिसिया शहरात दररोज सायरन वाजवला जात असून पोलिसांनी युक्रेनचे नागरिक आणि महाराष्ट्रातील काही विद्यार्थाना सुरक्षित स्थळी नेऊन ठेवले आहे. तेथील शासनाने या विद्यार्थ्यांना आपल्या मायदेशी परतण्यास सांगितले आहे. परंतु या विद्यार्थ्यांसमवेत युक्रेनमधील काही पुरुष आणि महिला आपल्या लहानग्या मुलांना घेऊन आहेत. हे सर्व विद्यार्थी सोबत असलेले युक्रेनचे नागरिक आणि बालकासोबत खूपच मिसळले आहेत.
त्यामुळे आम्हाला त्यांची खूप दया येते सोडून जावस वाटत नाही. असे दिव्यानीने सांगितल्याचे तिचे वडील सुरेश बांबोळकर यांनी सांगितले.