VNI:-
संशोधन केंद्राला घालून दिलेली विद्यार्थ्यांच्या संख्येची अट निरस्त करा : गोंडवाना विद्यापीठ शिक्षण मंचाची कुलगुरुंकडे मागणी
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली अंतर्गत विवीध विद्या शाखेकरिता विवीध महाविद्यालयात संबधित विषयाकरिता संशोधन केंद्राची निर्मिती करण्यात आली असुन विद्यापीठ अनुदान आयोगाचे कोणतेही निर्देश नसतांना सदर संशोधन केंद्रांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या 20 अशी निर्धारित करण्यात आली आहे. गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीने नुकत्याच आयोजित केलेल्या आचार्य पदवी प्रवेश परीक्षेमध्ये जवळपास 950 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले असून अनेक विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या या अटीमुळे संशोधन केंद्रावर प्रवेश घेण्यास व संशोधन मार्गदर्शकांना विविध अडचणी निर्माण होत असून सदर विद्यार्थी संख्यांची अट तात्काळ रद्द करण्यात येऊन संशोधन केंद्रावर संशोधन मार्गदर्शकांच्या संख्येप्रमाणे विद्यार्थी संख्या विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार निश्चित करण्यात यावी. तसेच गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीने यूजीसी रेगुलेशन 2016 परिच्छेद क्रमांक 5.2.1 च्या अनुषंगाने विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयाच्या संशोधन केंद्रावर कोणत्या विषयाचे किती संशोधन मार्गदर्शन (Ph.D. Guide) उपलब्ध आहेत व त्या अनुषंगाने संशोधन करण्यासाठी किती विद्यार्थ्यांकरीता जागा उपलब्ध आहे याविषयी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर तात्काळ माहिती प्रकाशित करावी अशी मागणी गोंडवाना विद्यापीठ शिक्षण मंचाने निवेदनाद्वारे कुलगुरू प्रशांत बोकारे गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांना केली आहे.
गोंडवाना विद्यापीठ शिक्षण मंचद्वारे डॉ. अरुणप्रकाश अध्यक्ष, डॉ. रुपेंद्रकुमार गौर महामंत्री, डॉ रमेश सोनटक्के कोषाध्यक्ष, डॉ. सुरेश खंगार, डॉ. मृणाल काळे, डॉ. राजीव वेगीनवार, डॉ. राजू कसारे, डॉ. चंद्रमौली, डॉ. सुरेश बाकरे, डॉ. शुभांगी वडसकर, प्रा. विनोद कुकडे सहकोषाध्यक्ष, डॉ. रवींद्र धारपवार सचिव, डॉ. भुषण आंबेकर, डॉ. गणपत देशमुख, प्रा. सुरेश कंती, डॉ पंकज चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर निवेदन कुलगूरू कडे देण्यात आले.