भारतातील हवामान बदल परिणाम व उपाय - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

भारतातील हवामान बदल परिणाम व उपाय


दि.१३.०६.२०२२

Vidarbha News India:-
VNI:-
विदर्भ न्यूज इंडिया
भारतातील हवामान बदल परिणाम व उपाय

लेखन- प्रविण यादव मुंजमकार (शिक्षक, देसाईगंज)

“ वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” - संत तुकाराम महाराज 

प्रस्तावना:-
        
भारत जगातील विविधतेने नटलेला, निसर्गसौंदर्याने सजलेला, पृथ्वीच्या मध्या लगत कर्क वृत्तावर आणि आशिया खंडात वसलेला देश आहे. ज्याला उत्तरेकडे हिमालयाचे संरक्षण आणि दक्षिणेकडे हिंद महासागर व बंगालच्या उपसागर तसेच पूर्वेकडे अरबी समुद्राचे संरक्षण आहे. हिमालय जणू काही भारता चे मुकूट व हिंद महासागर भारताचे चरणस्पर्श करीत आहे. भारतामध्ये विविध राज्यात विविध भाषा बोलल्या जातात. विविध जाती, धर्म, संस्कृतीचे जतन केले जाते. विविध राज्यातील खान-पान, संस्कृती, वेशभूषा, उद्योग-व्यवसाय हे सर्व जरी वेगळे असले तरी या सर्व विविधते मध्ये भारताला एकसंध बांधण्याचे काम भारतीय संविधान यशस्वीपणे करते आहे. भारतात ज्याप्रमाणे सामाजिक-सांस्कृतिक विविधता आहे, त्याचप्रमाणे भारतातील वेगवेगळ्या भागातील वातावरणही भिन्न आहे. भारत हा आशिया खंडातील प्रमुख विकसनशील देश आहे भारत आता एकविसाव्या शतकात उद्योग, विज्ञान, शिक्षण, आरोग्य अशा विविध क्षेत्रात जोमाने प्रगती करत आहे. भारताच्या या  प्रगतीमध्ये अनेक समस्या आहेत.  जसे वातावरण बदल, हवामानात बदल,  लोकसंख्या विस्फोट, साधनसामग्री चा अभाव इत्यादी अनेक समस्या असतानाही भारत आपली दिन दोगुनी रात चौगुनी प्रगती करत आहे. असे असले तरीही भारतातील हवामान बदलाचा या सर्व गोष्टींवर परिणाम होताना आपणाला दिसत आहे. म्हणून या हवामानबदलाचा अभ्यास करणे नितांत गरजेचे आहे. भारतातील हवामानातील बदल कसा आहे? त्याचे परिणाम काय आहेत? व त्यावर काय उपाययोजना करून आपण अनुकूल वातावरण तयार करू शकतो याचे सविस्तर विवेचन प्रस्तुत लेखातून करण्यात आले आहे.
भारतातील हवामान:-
        
पृथ्वीवरील वातावरणात होणाऱ्या बदलांना हवामानातील बदल म्हणतात. हवामानात वारंवार बदल होत असतात. वातावरणात बदल घडवून आणणारे अनेक घटक आहेत. ओडम(1971) यांच्या मते “प्रदूषण म्हणजे हवा जमीन आणि पाणी यांच्या भौतिक, जैविक, रासायनिक गुणवैशिष्ट्या मध्ये होणारे अनिष्ट बदल होय, की जे मानवी जीवन किंवा इतर जीवप्रजाती, औद्योगिक प्रक्रिया, जीवनाची स्थिती आणि सांस्कृतिक मालमत्तेला हानिकारक ठरतील.” या सर्वांचाच परिणाम हवामान बदलावर होत असतो. 
                 
भारतीय हवामानात भारताच्या वैविध्यपूर्ण हवामानाचा समावेश होतो. भारताचे हवामान हे साधारणपणे मोसमी हवामानाच्या प्रदेशात जरी मोडत असले तरी जगात कुठेही न आढळणारी हवामानातील विविधता येथे आढळते. भारतात साधारणपणे सहा मुख्य प्रकारचे हवामान आढळते. त्यात अंदमानमध्ये आढळणारे विषुववृत्तीय सदाहरित जंगलापासून ते पश्चिम राजस्थान मधील थरचे वाळवंट पण आढळते. दक्षिण भारतातील उष्ण व दमट हवामान या पासून ते उत्तरेकडील हिमालयामधील वृक्षाची जंगले तसेच हिमनद्या व शीत वाळवंट यांचा समावेश होतो. परंतु या विविधतेत सर्वात महत्त्वाचा घटक आहे ते मोसमी वारे व त्यांनी येणारा पाऊस ज्यावर संपूर्ण भारतात खास करून शेती उद्योग अवलंबून आहे. भारतात ढोबळमानाने चार ऋतू आढळून येतात मोसमी पावसाचा काळ जून ते सप्टेंबर, मोसमी पावसा नंतरचा काळ ऑक्टोबर ते डिसेंबर, हिवाळा जानेवारी व फेब्रुवारी व उन्हाळा मार्च ते मे अशा प्रकारे भारतात ऋतुमान आढळते.
       
भारतीय हवामानात वैविध्य येण्यास मुख्यतः येथील भौगोलिक परिस्थिती जबाबदार आहे. हवामानाचे संपूर्ण नियंत्रण हे उत्तरेकडील हिमालय व पश्चिमेकडील थरच्या वाळवंटात मुळे होते. हिमालय मुख्यत्वे उत्तरेकडून गोबीच्या वाळवंटा कडून येणारे जबरदस्त थंड वारे रोखून धरतो व थरचे वाळवंट हे दक्षिणेतील हिंदी महासागरातून व अरबी समुद्रातून बाष्पयुक्त वारे आकर्षित करतो यामुळे भारताचे एकूण हवामान वर्षभर गरमच असते. तसेच कर्कवृत्त हे भारताच्या साधारणपणे मध्यभागातून जात असल्याने भारताला तसेच विषुववृत्तीय देशातच धरले जाते. इतर देशांप्रमाणे भारतात देखील हवामानाचे टोकाचे बदल होऊ शकतात. खूप पाऊस प्रचंड दुष्काळ चक्रीवादळे व पूर व इतर नैसर्गिक आपत्तींचा या देशाला बरेचदा सामना करावा लागतो.
         
वर नमूद केल्याप्रमाणे भौगोलिक परिस्थिती, भारतीय हवामान वैविध्यपूर्ण होण्यात खूप महत्वपूर्ण आहे.  भारतीय हवामान हे हिमालय तसेच पश्चिमेला हिंदुकुश पर्वत व थारचे वाळवंटाने मुख्यत्वे नियंत्रित होते. हे पर्वत उत्तरेकडून येणारे थंड वारे रोखून धरतात व थारचे वाळवंट हे दक्षिणेतील हिंदी महासागरातून व अरबी समुद्रातून बाष्पयुक्त वारे आकर्षित करतो जे जून ते सप्टेंबर या महिन्यात भारताच्या बहुतेक भागात पाऊस पाडतात. भारताच्या सर्व भागात पावसाचे प्रमाण हे असमतोल आहे यात मुख्यत्वे स्थानिक भौगोलिक परिस्थितीचा मोठा वाटा आहे. भारतात पावसाच्या प्रमाणानुसार सात मुख्य हवामानाचे झोन आहेत व त्याची वर्गवारी पडणारा पाऊस तापमान यावर केली आहे.
        
विषुववृत्तीय आंध्रप्रदेश यात मुख्यत्वे भारतातील दमट प्रदेश येतो. या प्रदेशात  पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस व इतर वेळ हवामान दमट राहते. यात मुख्यत्वे भारतातील कोकण किनारपट्टी सह्याद्री आसाम मेघालय त्रिपुरा मिझोरम लक्षद्वीप व अंदमान आणि निकोबार बेटांचा समावेश होतो. येथे साधारणपणे वर्षभर आद्रते मुळे येथील तापमान केव्हाही जास्तच असते. परंतु आद्रतेमुळे अति उन्हाळा पण येथे अनुभवयास मिळत नाही. तापमान 18 ते 35 अंश सेल्सिअस यामध्येच असते परंतु उन्हाळ्यामध्ये कधीकधी अति दमट हवेमुळे येथील जीवन असह्य होते.  पाऊस फक्त पावसाळ्यातच होतो पण प्रचंड होतो. येथील सरासरी पावसाचे प्रमाण वार्षिक 2000 मिमी इतके आहे. मेघालयातील चेरापुंजी येथे जगातील सर्वात जास्त पाऊस होतो. जुलै 26 2005 रोजी मुंबईमध्ये एका दिवसात हजार पेक्षा जास्त मिमी पाऊस पडला. ही मानवी इतिहासातील सर्वात जास्त पाऊस पडल्याची घटना आहे. पाऊस मे ते नोव्हेंबर या दरम्यान होतो. डिसेंबर ते मार्च हे महिने शुष्क असतात. पावसाचे सर्वाधिक प्रमाण जुलै महिन्यात अनुभवावयास मिळते व सप्टेंबर पर्यंत नियमितपणे पाऊस पडतो. ऑक्टोबर व नोव्हेंबर या महिन्यात मुख्यत्वे परतीचे मोसमी वाऱ्यांमुळे अनियमितपणे पाऊस पडतो. पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे येथे सदाहरित जंगले आहे या जंगलांमध्ये मोठ्या प्रमाणावर जैवविविधता आढळून येते.
विषुववृत्ती शुष्क प्रदेश:- 
      
भारताच्या दख्खनच्या पठारावर तसेच सह्याद्रीच्या पूर्व भागात पावसाचे प्रमाण कमी होत जाते. याचे मुख्य कारण सह्याद्री मोसमी वारे काही प्रमाणात अडवून धरतो व सह्याद्री ओलांडल्यानंतर काहीवेळ हे वारे जास्त उंचीवरून वाहतात. परिणामी पाऊस जमिनीवर पोहोचण्यास असमर्थ ठरतो यालाच पर्जन्य छाया असे म्हणतात. यामुळे महाराष्ट्र व कर्नाटक या राज्याच्या बहुतेक भाग शुष्क आहे. येथील तापमानात आंध्रप्रदेश पेक्षा जास्त प्रमाणात बदल होताना दिसतो. उन्हाळे अतिशय कडक असतात.  तापमान 40 ते 44 अंश सेल्सिअस पर्यंत जाऊ शकते. तसेच विषुववृत्ताजवळ असल्याने हिवाळा फारसा कडक नसतो, परंतु काही दख्खन पठाराच्या उत्तर भागात हिवाळ्यात रात्री तापमान दहा अंशाच्या पर्यंत खाली जाऊ शकते. हा भाग शुष्क असला तरी आक्टोंबर नोव्हेंबरमध्ये वाहणाऱ्या परतीच्या मोसमी वाऱ्यांमुळे बंगालच्या उपसागरातील बाष्प भारतीय द्वीपकल्पात आकर्षित होते व द्वीपकल्पीय शुष्क भागात पाऊस पाडतात. खास करून तामीळनाडू व आंध्र प्रदेशात हा पाऊस मोठ्या प्रमाणावर पडतो. पावसाबरोबरच या दिवसात चक्रीवादळाचे दर वर्षी एखाद-दुसरे आक्रमण या भागात होते. ह्या भागाचे तीन उपविभाग पडतात सम शुष्क, शुष्क व अतिशुष्क. अशाप्रकारे भारतातील हवामान आहे. 
भारतातील हवामान बदल :-
      
हवामान बदल हा शब्द बहुदा मानववंश हवामान बदलाला विशेषता वापरला जातो. मानवी कृतीमुळे मानव वंशातील हवामानातील बदल घडतात. पृथ्वीच्या नैसर्गिक प्रक्रियेचा एक परिणाम म्हणून हवामानातील बदलांच्या विरुद्ध या अर्थाने विशेषता पर्यावरण विषयक धोरणाच्या संदर्भात हवामान बदल हा शब्द मानववंश ग्लोबल वार्मिंगचा पर्याय बनला आहे. वैज्ञानिक जर्नल्समध्ये ग्लोबल वार्मिंग चा अर्थ पृष्ठभागाच्या तापमानात वाढ होण्याचा संदर्भ असतो, हवामान बदलामध्ये ग्लोबल वार्मिंग चा समावेश असतो. आणि ग्रींहाऊस गॅसच्या वाढत्या पातळीवर परिणाम होतो. जागतिक हवामान संघटना WMO, 1966 मध्ये दहा वर्षापेक्षा जास्त काळ कालावधीत सर्व प्रकारचे हवामान बदल करण्याच्या हेतूने संबंधित हवामान विषयक बदल प्रस्तावित केला होता. 1970 च्या दशकात हवामान बदलाच्या शब्दाने हवामान बदलाची जागा मानव वंशीय कारणावर केंद्रित करण्यासाठी बदलली आहे. कारण हे स्पष्ट झाले की मानवी क्रियाकलापामध्ये हवामान बदलण्याची क्षमता आहे. हवामान बदल मध्ये पॅनेल ऑन क्‍लायमेट चेंज (IPCC) आणि यूएन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज हवामान बदलाचा समवेश होतो . हवामान बदल आता प्रक्रियेचे तांत्रिक वर्णन तसेच समस्येचे वर्णन करण्यासाठी सज्ञा म्हणून वापरले जाते.
हवामान बदलाची मूलभूत कारणे:-
        
हवामान घटकांपैकी पाऊस, तापमान, आर्द्रता, सूर्यप्रकाशाचा कालावधी, हवेचा दाब, वाऱ्याचा वेग, बाष्पीभवनाचा वेग या व अशाच अन्य घटकांमध्ये मोठ्या प्रमाणात नेहमीपेक्षा बदल होणे; तसेच तो बदल जाणवण्याइतपत असणे, यामुळे वातावरण आणि पर्यावरण बदलणे आणि हवामान घटकांच्या नेहमीच्या आकडेवारीत सांख्यिकीय बदल दिसणे, यास हवामान बदल ही संज्ञा प्राप्त झाली आहे.
         
सूर्यापासून मिळणाऱ्या प्रकाशाचा आणि त्यापासून निर्माण होणाऱ्या ऊर्जेचा पृथ्वीवर होणारा फरक, तसेच मिळालेली ऊर्जा परावर्तित करून वातावरणाचा राखला जाणारा समतोल अशा सर्व क्रियेत पृथ्वीच्या वातावरणीय तापमानात होणारे बदल, ऊर्जेचे वाऱ्यामुळे होणारे ध्रुवीकरण, समुद्राच्या पाण्याच्या तापमानात होणारी वाढ आणि त्या वाढीव तापमानाने होणारे बदल यामुळे पृथ्वीवरील विशिष्ट भागात जाणवणारे हवामानबदल अशी या हवामानबदलाच्या संज्ञेची सर्व साखळी आहे. जे हवामान घटक हवामान निर्मितीस उपयुक्त असतात, तेच त्या त्या भागातील हवामान घडवतात. त्यात प्रामुख्याने सूर्यापासून मिळणाऱ्या प्रकाशाचा कालावधी आणि ऊर्जा, पृथ्वी आणि सूर्यामधील अंतर, पृथ्वी स्वतःभोवती आणि सूर्याभोवती फिरत असताना तिचा सर्वसाधारणपणे होणारा कोन आणि त्यात काही कालावधीत होणारे बदल, पर्वत रांगा आणि भूपृष्ठावरील भौगोलिक परिस्थिती, त्यात डोंगर रांगा आणि त्यामुळे वाऱ्यास होणारा अडथळा, तसेच बर्फाच्छादित पृथ्वीचा भाग, पृथ्वीवरील वृक्ष, वने आदी नैसर्गिक घटक हे त्या-त्या भागातील हवामान ठरवण्यास उपयुक्त ठरतात. यावरून आपण हवामान घटकांची निरीक्षणे घेतल्यास फरक दिसतो, त्यानुसार आपण हवामान विभाग ठरवतो. या हवामान विभागात ज्या वेळी आकस्मिक मोठा फरक जाणवतो, तेव्हा आपण हवामान बदल ही संज्ञा वापरतो. हवामानात बदल घडवण्यामध्ये बाह्य घटकांचा किंवा अंतर्गत घटकांचा प्रभाव असतो. अंतर्गत घटकांमध्ये त्या त्या पातळीवर हवामान घटकांत होणारे बदल कारणीभूत ठरतात. बाह्य घटकांमध्ये सूर्यप्रकाशापासून मिळणाऱ्या ऊर्जेत होणारा फरक कारणीभूत ठरतो आणि ती ऊर्जा घट्ट पकडून किंवा साठवून ठेवणारे वायू यांचा प्रभाव कारणीभूत ठरतो.
      
सुरवातीचा हवामान बदल हा अंतर्गत किंवा बाह्य घटकांच्या प्रभावामुळे असू शकतो. एकदम थंड वातावरण तयार होण्यास हवेतील धुळीच्या कणांचे प्रमाण कोणत्याही कारणाने अधिक झाल्यास प्रकाश परिवर्तनाचे काम वेगाने करतात. त्यातही व्हलकॉनिक राखेचे प्रमाण वाढल्यास, समुद्राच्या पाण्याच्या उष्णतेमुळे होणारे प्रसरण किंवा या दोन्हींचा एकत्रित परिणामही असू शकतो.
अंतर्गत बदलास कारणीभूत घटक :-
पर्यावरण, हैड्रोस्पेअर, क्रायोस्पेअर, लिथोस्पेअर या सर्वांचे पृष्ठभागावरील माती, खडक आणि खडकांचा ठिसूळपणा यावर होणारे परिणाम.
समुद्राच्या पाण्याच्या तापमानात होणारे बदल :-
       
समुद्र हा हवामानाचा मूलभूत भाग आहे. समुद्रातील बर्फाळ थर, समुद्राची खोली, हे सर्व समुद्रातील पाण्याच्या तापमानावर बदल घडवीत असतात. ही बाब सातत्याने घडत असते. समुद्राच्या पाण्याचे तापमान स्थिर नसते. समुद्राच्या पाण्याच्या तापमानात प्रचंड अस्थिरता जाणवते. पृष्ठभागाच्या पाण्याच्या तापमानात त्यामुळे बदल होतात. पृष्ठभागावरील पाण्याच्या तापमानाचा संबंध पर्यावरणाशी जोडलेला असतो, त्यानुसार पर्यावरण बदल घडत असतात. त्यातूनच हवामान बदल घडतात. काही वेळा काही ठराविक काळात काही समुद्राच्या पाण्याचे तापमान बदलते. उदा. एल. निनो साऊदर्न ऑसिलेशन, दि पॅसिफिक डिकेडल ऑसिलेशन, दि नॉर्थ अटलांटिक ऑसिलेसन आणि आर्टिक ऑसिलेशन यामुळे हवामान घटकांमध्ये फरक पडतो. त्यानंतर समुद्रातील पाण्यात हळुवारपणे उष्णता खोलवर सामावून खोलीवर पाण्यात पाणी हालचालीस कारणीभूत ठरते. अशा प्रकारे समुद्रातील पाण्याच्या माध्यमातून ती सर्वत्र विखरली जाऊन पृथ्वीवरील सर्व समुद्रामध्ये उष्णतेचे ऊर्जेचे वितरण होते. अशा प्रकारे समुद्राच्या पाण्याच्या तापमानातही फरक होतात.
2) बाह्यघटक:-
      
पृथ्वी स्वतःभोवती फिरते आणि ती सूर्याभोवतीही फिरते. ती फिरत असताना सूर्याशी तिचा एक विशिष्ट कोन असतो. त्या कोनात थोडाही फरक पडल्यास सूर्याकडून पृथ्वीवर येणाऱ्या सूर्यप्रकाशाच्या प्रमाणात आणि ऊर्जेत फरक पडतो. हा फरक प्रत्येक हंगामानुसार पडतो, त्यामुळे प्रत्येक हंगामातील हवामानात फरक पडतो. एकूण मिळणाऱ्या सूर्यप्रकाशाच्या तासात फार थोडा फरक यामुळे पडत असला, तरी तो दर हंगामातील फरक मिळून नेहमीच्या सरासरीत फरक पडताना दिसतो; मात्र त्याचा मोठा बदल हंगामातील हवामानावर आणि भौगोलिकतेवर होताना दिसून येतो. पृथ्वीच्या फिरण्याच्या क्रियेतील तिचा होणारा सूर्याशी कोन आणि पुढे त्यानुसार फिरत राहण्याची क्रिया याचा परिणाम होतो, त्यानुसार हवामानात बदल घडत असतात. याचा मोठा परिणाम पृथ्वीच्या सभोवती असणाऱ्या वातावरणातील वायूंच्या प्रमाणावर होतो, त्यातच आता ग्रीन हाऊस गॅसेस असे संबोधले जाते. चार अब्ज वर्षांपासून ते आतापर्यंतचा अंदाज घेतल्यास सूर्यापासून मिळणाऱ्या ऊर्जेत वाढ होत आहे, असे दिसून येते आणि त्यामुळे पृथ्वीच्या आवरणातील वायूंच्या प्रमाणात बदल होताना दिसतात. साधारणपणे 2.4 अब्ज वर्षांतील ऑक्‍सिजिनेशन क्रियेत फरक होताना दिसून येते. यानंतरची आणखी पाच अब्ज वर्षे सूर्याचे सध्याचे अस्तित्व टिकेल असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. या सर्व काळात सूर्यावरही परिणाम होईल आणि सूर्याचे अस्तित्व तोपर्यंत कमी होईल, असेही शास्त्रज्ञांचे भाकीत आहे.
दर 11 वर्षांनी सोलर सायकल बदलते, त्यानुसार सूर्यापासून मिळणाऱ्या ऊर्जेवर परिणाम होत असतो. पृथ्वीवरील बर्फाच्या वितळण्यामुळे 1900 ते 1950 च्या काळात वाढ झाल्याचे दृष्टिपथात आले आहे. त्यापूर्वी इ.स. 1750 पूर्वीचा काळ आणि 1550 ते 1850 चा काळ हाही त्याचप्रमाणे दिसून आला आहे. 2011 तील नेचर या संशोधनपर प्रकाशनामध्ये ढगांच्या अभ्यासावर सादर केलेल्या लेखात हवेत धुळीच्या कणांच्या बरोबर सल्फ्युरिक ऍसिड आणि पाणी यांचे कॉस्मिक रेझने आयोनायझेशन होते. धुळीच्या कणांच्या प्रमाणात होणारी वाढ ही मानवी क्रियेतून होत असल्याचेही दिसून येते. यातूनही हवामान बदल होत असल्याचे लक्षात येते.
पृथ्वीमधून डोंगरभागात व्हल्कनायझेशन म्हणजेच ज्वालामुखी क्रियेने काही भागात वायू बाहेर पडतात. प्रत्येक शतकातील हे प्रमाण वाढत असून, याचाही परिणाम हवामान बदलावर होताना दिसून येतो. अशा प्रकारच्या घटना इ. स. 1815, इ.स. 1912 आणि इ.स. 1991 मध्ये टॅम्बोरा पर्वत रांगा, पिनट्युबो पर्वत रांगांमध्ये घडल्याचे दिसून आले आहे. त्याचा पर्यावरणावर परिणाम झाल्याचे दाखले आहेत. हवामानात नैसर्गिक बदल हे पूर्वीपासून होत आलेले आहेत. मात्र आता, विविध मानवी घडामोडींमुळं जागतिक तापमानात वाढ होत आहे. वीज प्रकल्प, वाहतूक आणि घरांमध्ये उष्णता वाढवण्यासाठी आपण इंधन, गॅस आणि कोळसा वापरायला सुरुवात केली, तेव्हापासून आतापर्यंत जगात 1.2 सेल्सिअस एवढं तापमान वाढलं आहे. त्याशिवाय या इंधनांच्या वापरामुळं हवेत सोडले जाणारे वायू हे, सूर्याची ऊर्जा अडवतात. 19 व्या शतकापासून आतापर्यंत वातावरणातील कार्बन डायऑक्साईड (CO2)या एकट्या हरितगृह वायूचं प्रमाण 50 टक्क्यांनी वाढलं आहे. तर गेल्या 20 वर्षात त्यात 12 टक्के वाढ झाली आहे. हरितगृह वायुंचं प्रमाण वाढण्याचं आणखी एक कारण म्हणजे जंगलतोड. झाडं जेव्हा जाळली किंवा तोडली जातात, तेव्हा ते साठवलेला कार्बन वातावरणात सोडत असतात.
हवामान बदलाचे परिणाम:-
1) भूभागावरील परीणाम
 1. मृदेतील आद्रतेचा असमतोल:- जास्त तापमानामुळे बाष्पीभवन आणि वनस्पतीमधील बाष्पोत्सर्जनाचा दर वाढून मृदा शुष्क बनू शकते उत्तर अमेरिका आणि दक्षिण युरोप मध्ये अशाप्रकारे मृदा शुष्क होण्याची शक्यता आहे .
2. वाळवंटीकरण वाढू शकतो.
3. बराच भूभाग पाण्याखाली जाऊ शकतो.
4. किनाऱ्यावर सागराच्या अतिक्रमणामुळे बराचसा भूभाग खारपड बनू शकतो.
2. वातावरणा वरील परिणाम 
1.पर्जन्यमान आणि ढगांच्या आच्छादनात वाढ:- तापमान वाढल्यास पाण्याचे बाष्पीभवन देखील वाढते. त्यामुळे सरासरी पर्जन्यमानात लक्षणीय वाढ होऊ शकते. त्याचप्रमाणे पर्जन्याचे स्थल आणि कालसापेक्ष वितरण हे अनियमित असेल. काही भागांमध्ये दुष्काळ तर काही भागात अतिरिक्त पर्जन्याने पूर अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. 40 वर्षांमधील युरोप मध्ये वाढलेले पर्जन्यमान आणि आफ्रिकेमध्ये सुदान येथे कमी झालेले पर्जन्यमान जागतिक तापमान वाढीचा परिपाक असू शकते.
2. उष्णकटिबंधीय वादळांची वाढलेली तीव्रता.
3. एल-निनो (El-Nino) परिणामाच्या वारंवारतेत वाढ आणि त्याचा मान्सूनवर प्रतिकूल परिणाम. 4. हवेच्या मेघा मध्ये वाढ होऊ शकते. 
5. उष्ण उन्हाळे. जास्त काळाच्या आणि वारंवार घडणाऱ्या सुष्क लहरीमुळे सार्वजनिक आरोग्य धोक्यात येऊ शकते.
3. समुद्रावर होणारा परिणाम
1. समुद्र पातळीत वाढ:- पृथ्वीवरील हिमाच्छादन विशेषतः ध्रुवीय हिमाच्छादन हळूहळू वितळून समुद्र पातळीत वाढ होत जाईल. मागील शतकातील एक सेल्सियस एवढ्या तापमानवाढीने सरासरी समुद्र पातळीत दहा ते वीस सेंटीमीटर ने वाढ झाली. वाढत्या समुद्रपातळी मुळे खालील गोष्टी घडतील.
* बराचसा किनाऱ्याजवळील भूभाग पाण्याखाली जाईल. सागरी पाण्याच्या अतिक्रमणामुळे बरीचशी जमीन खारवट बनेल. 
* नद्यांच्या उपसागरयांच्या क्षारतेमध्ये वाढ होईल.
* बरेचसे समुद्रकिनारे आणि कमी उंचीवरील बेटे पाण्याखाली जातील.
* किनारपट्टीची धूप वाढेल दलदली प्रदेश आणि कमी उंचीचे भूभाग पूरग्रस्त होतील किंवा नाहीसे होतील.
* तीव्र आणि वारंवार होणारी वादळे.
 संशोधकाच्या अंदाजानुसार कमी उंचीवरील प्रदेश आणि बेटे सेचिलीस, मालदीव, मार्शल, बांगलादेश, इजिप्त, लोरीज, लुसियाना अशा बेटांचा काही दशकात नाश होईल.
4. अधिवास आणि जीवसृष्टी वरील परिणाम
*  असंख्य सागरी जीव प्रजातींना अधिवास व अन्न पुरविणाऱ्या प्रवाळ भित्तिका मोठ्या प्रमाणावर नष्ट होतील. ( कोरल ब्लीचिंग आणि सागरी आणली करणामुळे अनेक नैसर्गिक अधिवास नष्ट होऊन अनेक जीव प्रजातींचा ऱ्हास होईल)
* सागरातील प्रकाश संश्लेषण आत घट होऊन या परीसंस्थांची उत्पादकता कमी होईल

5 मानवावर होणारा परिणाम
* दुष्काळाची वारंवारता वाढेल . अनेक प्रदेशातील जलपुरवठा घट होईल.
* तीव्र आणि जास्त काळासाठी असणाऱ्या उष्मा लहरीमुळे उष्माघात होण्याची शक्यता वाढेल. * डेंग्यू, मलेरिया, हत्ती रोग यासारख्या अनेक रोगांचा प्रसार वाढेल मानवी जीवन असहाय्य होईल.
* हवामान बदलामुळे मानवाची जीवनशैली बदलून जाईल.
* सुपीक जमिनीचे रेताड जमिनीत रूपांतर होईल पाण्याच्या कमतरतेमुळे पीक उगवणं कठीण होईल.
      असे भयान परिणाम हवामान बदलामुळे होतील. 
हवामान बदलाबाबत उपाय:-
     
हवामान बदलावर उपाय म्हणून भारताने 2020 पर्यंत 2005 मध्ये असणारे जीडीपी संबंधीचे उत्सर्जन प्रमाण 20% ते 25% GDP च्या प्रति घटक उत्पादना मागे होणारे कार्बन उत्सर्जन इतके कमी करण्याचे ठरविले. UNFCCC करारानुसार भारतावर हे बंधन नाही. या  लक्षानुसार भारताने 2005 ते 2010 या काळात जीडीपी संबंधीचे उत्सर्जन प्रमाण 12 टक्‍क्‍यांनी कमी करण्यात यश मिळवले. हवामान बदलाच्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी भारत करत असलेल्या उपाययोजना या प्रमाणे आहेत.
1. स्वच्छ व कार्यक्षम ऊर्जा प्रणाली
                     
भारत सध्या मोठ्या प्रमाणावर अक्षय ऊर्जा निर्मिती प्रकल्प राबवित आहे. 2002 ते 2015 दरम्यान अक्षय ऊर्जा निर्मितीचा हिस्सा सहापट (2 टक्क्यांवरून 13 टक्के) वाढला आहे येत्या काळात 175 गिगावॅट इतकी अक्षय ऊर्जा निर्मिती उभारण्याचे भारताचे लक्ष आहे . पवन ऊर्जा, सौर ऊर्जा बायोमास, जलविद्युत, अनुऊर्जा इत्यादी ऊर्जा प्रकारात भारताने आघाडी घेतल्याचे दिसून येते.
2. औद्योगिक क्षेत्रात ऊर्जा कार्यक्षमता वाढवणे
               
 मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया यासारख्या धोरणामुळे औद्योगिक क्षेत्र विस्तारत आहे. या विस्तारत्या औद्योगिक क्षेत्रांमध्ये ऊर्जेची बचत करण्याचे शासनाचे धोरण आहे. या अंतर्गत Perform Achieve and trade (PAT) तसेच झिरो इफेक्ट झिरो डिफेक्ट या योजना राबविल्या जात आहेत.
3) नागरी पर्यावरण संवेदनशील केंद्राची उभारणी
        
 केंद्र सरकारने नागरी विकासासाठी स्मार्ट सिटी अमृत योजना तसेच हृदय ( HRIDAY )या योजना सुरू केल्या आहेत. या योजनांची अंमलबजावणी करताना शासनाने शाश्वत विकास हे सूत्र महत्त्वाचे मानले आहे. याकरिता पर्यावरण सुरक्षेसाठी कचऱ्याचा पुनर्वापर, नैसर्गिक पर्यावरणाची जपणूक यावर भर देण्यात आला आहे. नागरी भागात पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील केंद्रे उभारण्यात येणार आहेत.
4. कचऱ्यापासून संपत्ती 
             
वेस्ट टू वेल्थ या अंतर्गत कचऱ्यापासून ऊर्जा तयार करण्याचे धोरण आहे. यासाठी कचऱ्यापासून खत निर्मिती तसेच घनकचरा व्यवस्थापन (SWM) हे कार्यक्रम सुरू आहेत.
5. सुरक्षित स्मार्ट व शाश्वत हरित परिवहन सेवा
                
कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या उद्देशाने सरकारने कमी कार्बन उत्सर्जन करणाऱ्या पायाभूत सुविधा उभारण्याचे धोरण अंगीकारले आहे. याअंतर्गत समर्पित मालवाहतूक (Dedicated freight corridor) सारख्या परिवहन यंत्रणांची उभारणी करण्यात येत आहे. भारतीय रेल्वे दररोज तीन दशलक्ष टन मालाची वाहतूक करते. रेल्वेचे हे वाहतुकीचे प्रमाण वाढवून रस्त्यावरील वाहतुकीच्या वाहनांची संख्या कमी करण्याचे शासनाचे धोरण आहे. रेल्वे बरोबरच जलमार्गाचा विकास करण्याचाही शासनाचा मानस आहे. यासाठी जलमार्ग विकास या योजनेची घोषणा करण्यात आली आहे. या शिवाय सागरमाला प्रकल्पाच्या माध्यमातून जलमार्गाने मालवाहतूक करण्याचे प्रयत्न आहेत. राष्ट्रीय महामार्गावरील प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने हरित महामार्ग ही योजना सुरु केली आहे.
6. नियोजित वनीकरण 
            
इसवी सन 2005 मध्ये देशात 23.5% असणारे वनक्षेत्र 2013 मध्ये 24% इतके झाले. हवामान बदलावर उपाय म्हणून वनीकरण महत्त्वाचे आहे. केंद्र सरकार विविध माध्यमातून उपाययोजना करीत आहे. हरित भारत अभियान हे त्यापैकीच एक होय. या अभियानाच्या माध्यमातून पाच दशलक्ष हेक्‍टर इतके क्षेत्र वनांखाली आणण्याचे उद्दिष्ट आहे.
हवामान बदल आणि यावरील उपायांसाठी वित्तीय व्यवस्था
1) राष्ट्रीय स्वच्छ पर्यावरण निधी:  कोळशावर प्रतिटन ठराविक अतिरिक्त कर लादून हा निधी उभारण्यात येतो. 2010 साली हा कर प्रतिटन पन्नास रुपये 0.8 डॉलर होता.  नुकतेच त्याचे प्रमाण 200 रुपये प्रति टन करण्यात आले आहे. या निधीतून अक्षय निर्मल उर्जा निर्मिती तंत्रज्ञान व संबंधित प्रकल्पांना वित्त पुरवठा केला जातो.
2) राष्ट्रीय अनुकूल निधी: कृषि, वन इत्यादी क्षेत्रातील अनुकूलन उपाययोजना साठी हा निधी उभारण्यात आला. सुरुवातीला हा निधी 3500 दशलक्ष रुपयांचा होता. वित्त पुरवठा करण्यासाठी काही इतर उपाययोजना करण्यात आला.  
* पेट्रोल व डिझेल सारख्या जीवाश्म इंधनावरील अनुदान कमी करून त्यावरील कर वाढविणे.
* करमुक्त पायाभूत सुविधा रोखे.
* चौदाव्या वित्त आयोगाने राज्यांना देण्यात येणारे निधीचे निकष ठरविताना त्यासाठी वनांखालील क्षेत्र या घटकाला 7.5% भार दिला यामुळे राज्यांना वनीकरण करण्यास प्रोत्साहन मिळाले.
* हरित हवामान निधी हवामान बदल अशी अनुकूलन आणि उपशमन घडवून आणण्यासाठी विकसनशील राष्ट्रांना मदत व्हावी या हेतूने (UNFCCC) अंतर्गत या निधीची स्थापना करण्यात आली.

बहिर्गत सहकार्य 
             
उपशमन व अनुकूलन उपाययोजनांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेतील कार्बन तीव्रता कमी होताना दिसत आहे. ऊर्जेची वाढती कार्यक्षमता एकूण ऊर्जेमध्ये अक्षय ऊर्जेचा वाढता हिस्सा हे या उपाययोजनांमुळे शक्य झाले. या उपाययोजना करण्यासाठी विविध द्विपक्षीय व बहुपक्षीय सहकार्यात्मक प्रयत्न उपयोगी ठरले. तसेच भारतातील पर्यावरण सुसह्य तंत्रज्ञान काही  विकसनशील देशांना ही उपयुक्त ठरले.
संकल्पित राष्ट्रीय निश्चित योगदान (Intended Nationally determined Contributions – INDC)                 .                
पॅरिस येथील COP 21 च्या पूर्वी आक्टोंबर 2015 च्या पहिल्या आठवड्यात जगातील सुमारे 180 देशांनी त्यांचे आय एन डी सी प्रस्ताव UNFCCC ला सादर केले.  त्या देशाची हवामान कृती योजना ( Cimate action plan) म्हणून ओळखली जाते. या योजनेद्वारे ते देश हवामान बदला विरोधात कोणत्या उपाययोजना करणार आहेत हे सांगितले जाते. भारताने आपला INDC 1 ऑक्टोंबर 2015 रोजी सादर केला.
हवामान बदलावर राष्ट्रीय कृती योजना (National Action Plan On climate change .    
              
या योजनेची सुरुवात 2008 मध्ये झाली या योजनेमध्ये खालील अभियानाचा समावेश होतो.
1) राष्ट्रीय सौर अभियान(National solar mission):  जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय सौर अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट 2022 पर्यंत 20 हजार मेगावॅट सौर विद्युत ऊर्जेची निर्मिती करणे आहे. 
2) वाढीव ऊर्जा कार्यक्षमतेसाठी राष्ट्रीय अभियान (National Mission For enhanced energy efficiency): ऊर्जा मंत्रालय आणि ऊर्जा कार्यक्षमता ब्युरो या अभियानाचे व्यवस्थापन करतात. शहर विकास योजनेचा एक अविभाज्य भाग म्हणून ऊर्जा कार्यक्षमतेत हे अभियान प्रोत्साहन देते.
3) शाश्वत अधिवासावर राष्ट्रीय अभियान (National  mission  for sustainable habitat): या अभियानाअंतर्गत इमारतीमध्ये ऊर्जा कार्यक्षमता वाढवणे, घनकचऱ्याचे व्यवस्थापन, सार्वजनिक वाहतुकीचा वापर इत्यादी साठी प्रोत्साहन दिले जाईल.
4) हरित भारतासाठी राष्ट्रीय अभियान ( National Mission for a green India): या अभियाना अंतर्गत हरित भारतासाठी परिसंस्था सेवा मध्ये वाढ आणि वनीकरण केले जाईल. या अभियानाची अंमलबजावणी राज्यांच्या वनविभागामार्फत असणाऱ्या संयुक्त वनव्यवस्थापन समित्या मार्फत केली जाईल. उद्दिष्टे- भारतातील वनांचे आच्छादन 33% पर्यंत वाढविणे हे होईल. 
5) शाश्वत शेतीसाठी राष्ट्रीय अभियान (National Mission For sustainable agriculture): हवामान बदल हे कृषी क्षेत्रासमोर अनेक आव्हाने निर्माण करणार.  भारतीय कृषी क्षेत्राचे हवामान बदलाशी अनुकूलन घडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. याकरिता नवनवीन वाण विकसित करणे आणि पर्यायी पीक पद्धतीचा वापर करून घेण्यात येईल. पिक विमा अशा योजना राबविण्यात येतील. 
6) राष्ट्रीय जल अभियान ( National water mission): भारतामध्ये सन 2050 पर्यंत पाणी टंचाईची गंभीर समस्या बनणार आहे. म्हणून या अभियानाद्वारे जलसंवर्धन व वाया जाणाऱ्या  पाण्यावर नियंत्रण, पाण्याचे समान वितरण व जलसंसाधनाचे प्रभावी व्यवस्थापन, पाणीवापराच्या कार्यक्षमतेत 20% ने वाढ घडवून आणणे, पर्जन्य जल साठवणूक करणे, प्रभावी सिंचन पद्धतीचा वापर करणे, जसे ठिबक सिंचन, समुद्रकिनारी शहरांची पाण्याची गरज काही प्रमाणात सागरी पाण्याचे निरक्षरण एकीकरण करून भागविणे. 
7) हवामान बदला वरील धोरणात्मक ज्ञानासाठी राष्ट्रीय अभियान ( National Mission on strategic knowledge on climate change): पर्यावरण पूरक संशोधन आणि तंत्रज्ञान विकासासाठी जागतिक समुदायांमध्ये सहकार्य निर्माण करण्यासाठी हे अभियान प्रयत्न करते.  त्याबरोबर हवामान बदलाशी संबंधित संस्था आणि हवामान संशोधन निधी चा वापर करून हे अभियान संशोधन प्रोत्साहन देते. त्याबरोबर तंत्रज्ञान विकासामध्ये खाजगी क्षेत्राचा सहभाग वाढविणे या अभियानास अपेक्षित आहे. 
8) हिमालयीन परिसंस्था कायम ( National Mission For Himalayan ecosystems) राष्ट्रीय अभियान :  हिमालय परिसंस्था अत्यंत संवेदनशील असून भारतातील परिस्थिती या संवर्धनासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. तापमान वाढ पर्जन्यमानात होणारे बदल दुष्काळ आणि वितळणार्या हिमनद्या इत्यादी परिसंस्थेच्या अस्तित्वा समोर असणारी आव्हाने आहेत. हे अभियान स्थानिक लोक समुदायाचा सहभाग या परिसंस्था च्या संवर्धनात करून घेण्याचा प्रयत्न करते. नव राष्ट्रीय जैवऊर्जा अभियान हे नवे अभियान 12 व्या पंचवार्षीक योजने दरम्यान सुरु करण्यात आले आहे. हे अभियान जैव वस्तुमान ज्वलन आधारित विद्युत केंद्राची स्थापना करण्यासाठी धोरणात्मक तसेच नियमनात्मक आराखडा पुरवेल.
पर्यावरणासाठी कार्यरत असणाऱ्या काही आंतरराष्ट्रीय संस्था
1) निसर्ग आणि नैसर्गिक संसाधनाच्या संवर्धनासाठी आंतरराष्ट्रीय संघटना. (International union for conservation of nature and national resources- IUCN) 1948
2) Intergovernmental panel on climate change (IPCC) 1988
3) संयुक्त राष्ट्र संघ पर्यावरण कार्यक्रम 1972 (UNEP- United nations environmental programs)
4) वर्ल्ड वाइल्ड लाइफ फंड (world wildlife fund – WWF) 1961
 5) जागतिक हवामान शास्त्रीय संघटना 1950 (World meterological organization- WMO)
6) जागतिक पर्यावरण सुविधा 1991 ( Global environmental facilities- GEF)
7) कारबन भागीदारी सुविधा (Carbon partner6facility – CPF)
 8) वन कार्बन भागीदारी सुविधा (Forest carbon partnership facility – FCPF)
 9) बाजार सिद्धतेसाठी भागीदारी ( Partnership for market readyness – PMR)
10) विकासासाठी कार्बन पुढाकार 2007 ( Carbon initiative for development)
11) बायो कार्बन फंड इनिशिएटिव्ह सस्टेनेबल फॉरेस्ट लँडस्केप ( Biocarbon fund initiative for sustainable forest landscape – ISFL) 
 12) बर्ड लाइफ इंटरनॅशनल 1922 
13) बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी  1883.
समारोप:-
                  
आपण प्रस्तुत लेखात भारतातील हवामान बदल, त्याचे परिणाम व उपाय - यामध्ये भारतातील हवामान, भारतातील हवामानातील बदल, हवामान बदलाची मूलभूत कारणे, हवामान बदलाचे विविध परिणाम आणि हवामान बदलाबाबत विविध उपाय तसेच सरकारी योजना आणि पर्यावरणासाठी कार्यरत असणाऱ्या काही राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांचा अभ्यास आपण केलेला आहे.
                   
अशा प्रकारचे विविध उपाय विविध संघटना द्वारे विविध संस्थांद्वारे पर्यावरण वाचविण्याकरिता अर्थात हवामानातील बदलांचे होणारे विपरीत परिणाम थांबविण्याकरिता विविध उपक्रम व कार्यक्रम करण्यात येत आहेत. अशा प्रकारच्या कार्यक्रमाद्वारे नक्कीच हवामान बदलाचा कमीतकमी विपरीत परिणाम होऊन सर्व प्राणिमात्रांचे तसेच मानव जातीचे कल्याण होण्याकरीता योजना आखल्या जात आहेत.  आणि सर्वांचे कल्याण होईल म्हणूनच भारत हा देश जगामध्ये निसर्गपूजक तर आहेच पण आता निसर्गा सवे जगणे हे क्रमप्राप्त झाले आहे. कारण याद्वारेच आपण आपले पर्यावरण वाचवू शकतो आणि आपले स्थैर्य आणि अस्तित्व टिकवू शकतो. म्हणूनच संत तुकाराम महाराजांच्या म्हणण्यानुसार वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे म्हणजेच वृक्षवेली ही आमच्याकरिता सोयरे आहेत त्यांची सेवा करणे हाच आमचा धर्म आहे हेच आमचे कर्म आहे म्हणून भारत माझा महान आहे. धन्यवाद!
दिनांक: 05 जून 2021

भारतातील हवामान बदल परिणाम व उपाय
लेखन- प्रविण यादव मुंजमकार (शिक्षक, देसाईगंज)

Share News

copylock

Post Top Ad

-->