आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक ; एकनाथ शिंदे यांची ट्विट करत प्रतिक्रिया
विधान परिषद निवडणुकीनंतर शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस बाहेर येत आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे नाराज असल्याचे वृत्त होते.
त्यातच आता त्यांचे समर्थक समजले जाणारे 13 आमदार नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली होती. मध्यरात्री शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीत 13 आमदार अनुपस्थित होते. त्यानंतर शिवसेनेच्या गोटातील चिंता आणखी वाढली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज वर्षा निवासस्थानी शिवसेना आमदारांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. आज दिवसभर मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे.
सोमवारी पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेने आपले दोन्ही उमेदवार विजयी करण्यात यश मिळवले. मात्र, या निवडणुकीत काँग्रेससोबत शिवसेनेचेही मते फुटली असल्याची चर्चा सुरू आहे. आता फुटलेल्या मतांवरून आता शिवसेनेतच फूट पडतेय का, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
शिंदे घेणार टोकाची भूमिका?
गेले काही वर्ष नाराज असलेले शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि त्याच्या गटाचे आमदार यांनी टोकाचं पाऊल उचललं आहे अशी माहिती समोर येत आहे. एकनाथ शिंदे यांचा नाराज गट काल सायंकाळपासूनच नॉट रिचेबल असल्याची माहिती आहे. रात्रीच्या सुमारास 'एबीपी माझा'च्या प्रतिनिधींनी देखील काही आमदारांना फोन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनाही फोन नॉटरिचेबल लागला होता. शिवसेनेतली धुसफूस लक्षात येताच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील 'वर्षा' या निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी चर्चा केली.
