VNI:-
गडचिरोली : वाघाच्या हल्ल्यात पुन्हा एकाचा मृत्यू
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यात गेल्या आठ महिन्यात वाघांच्या हल्ल्यात 7 लोकांचा बळी गेला आहे. यात आता आणखी एकाची भर पडली आहे. सरपण गोळा करण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे.
ही घटना आज सोमवारी सकाळी 8 वाजेच्या सुमारास आरमोरी तालुक्याच्या शंकरनगर जंगलात घडली. काय आहे संपूर्ण प्रकरण - बळीराम शिवराम कोलते, असे वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या 47 वर्षीय मृताचे नाव आहे. ते सालमारा येथील रहिवासी होते. बळीराम कोलते हे आरमोरी तालुक्याच्या सालमारा येथील जोगीसाखरा जवळील शंकरनगर नाल्यालगत कक्ष क्रमांक 47 राखीव जंगलात आपल्या दोन सहकाऱ्यांसोबत सकाळी गेले होते.
सरपणासाठी लाकडे आणण्यासाठी ते याठिकाणी गेले होते. ते सरपण जमा करत होते. मात्र, याचठिकाणी एक वाघ दबा धरुन बसला होता. सरपण जमा करताना त्याने बळीरामवर हल्ला करून त्याला ठार केले.
वारंवार मागणी अन् नागरिकांचा रोष - या घटनेची माहिती बळीरामच्या सहकाऱ्यांनी गावात दिली. यानंतर ही माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, वारंवार मागणी करूनही वाघांचा बंदोबस्त होत नसल्याने नागरिकांनी रोष व्यक्त केला.
त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण होते. हेही मागील आठ महिन्यात आरमोरी तालुक्यात वाघांच्या हल्ल्यात 7 लोकांचा बळी गेला आहे. यामध्ये कुरंझा, अरसोडा, आरमोरी, इंजेवारी, बोरीचक, शिवणी बु. व सालमारा येथील नागरिकांचा समावेश आहे. यातील शिवणी बु. येथील शेतकऱ्यावर चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रम्हपुरी तालुक्यातील त्याच्या शेतात काम करीत असताना वाघाने हल्ला केला. त्यात त्याचा मृत्यू झाला होता.