बुधुवारी सर्वत्र गणरायाचे वाजत गाजत आगमन झाले. गणपतीच्या आगमनामुळं सर्वत्र उत्साह पाहायला मिळत आहे. गणरायाच्या आगमनाबरोबरच राज्यात काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे. मुंबईसह ठाणे परिसरात चांगला पाऊस झाला. दरम्यान, आज देखील पावासाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
या जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट
पुढील दोन दिवसात राज्यातील काही जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. यामध्ये कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना देखील पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच अहमदनगर जिल्ह्यातही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
यलो अलर्ट म्हणजे नेमकं काय?
यलो अलर्ट म्हणजे नेमकं काय असा प्रश्न सगळ्यांना पडला असेल. तर या यलो अलर्टमध्ये हवामान खात्यानं हलक्या पावसाची शक्यता वर्तवलेली असते. तसेच यलो अलर्ट हा सावध राहण्यासाठी दिला जातो. हा इशारा वॉचसाठी दिलेला असतो. जेव्हा हवामानात बदल होतो तेव्हा हा अलर्ट दिला जातो. तुम्हाला तत्काळ धोका नाही. परंतु, हवामानाची स्थिती पाहता, तुम्ही ठिकाण आणि तुमच्या प्रवासाची काळजी घेतली पाहिजे, असे या अलर्टचा अर्थ आहे.