VNI:-
ऐन गणेशोत्सवात गडचिरोलीचे गजराज गुजरातला रवाना..!
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : अनेक महिन्यांपासून गडचिरोली जिल्ह्यातील हत्तींना स्थानांतरीत करण्याविषयीची भीती अखेर खरी ठरली असून ऐन गणेशोत्सव उत्साहात साजरा होत असताना शुक्रवार (ता.२) जिल्ह्याच्या पातानील येथील तीन हत्ती गुजरात राज्यात हलविण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्हाभरात संताप व्यक्त होत आहे. कमलापूरातील ४ हत्तींसह पातानील आणि ताडोबा येथील वयोवृद्ध आणि छोटी पिल्ले मिळून तब्बल १३ हत्तींची पाठवणी गुजरातमधील जामनगर येथील राधे कृष्ण टेंपल एलिफंट वेलफेअर ट्रस्टमध्ये केली जाणार आहे. एका भविष्यवेत्त्या गुरुजींनी या संग्रहालयात १३ पेक्षा अधिक आणि २२ पर्यंत हत्ती असतील तर अधिक भरभराट होईल, असा सल्ला दिल्याची चर्चा रंगली होती. एवढेच नव्हे तर महाराष्ट्रातील हे हत्ती मिळवण्यासाठी एका स्वयंसेवी संस्थेची मदत घेण्याच्या आणि मोबदल्यात त्या संस्थेला हेलिकॉप्टर देण्याच्या चर्चाही राज्यभर होत्या. दरम्यान ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील चार नर आणि दोन मादी हत्ती गुजरातला रवाना करण्यात आले होते.
मात्र, गडचिरोली जिल्ह्यातील निसर्गप्रेमी, विविध राजकीय पक्ष, सामाजिक व निसर्ग संस्था तसेच स्थानिकांचा विरोध बघता येथील हत्तींना हात लावण्यात आला नाही. मात्र, गजराजाचेच रूप मानल्या जाणार्या गणरायाचा गणेशोत्सव प्रारंभ होऊन दोन दिवस उलटत नाही तोच अहेरी तालुक्यातील पातानील येथील जगदीश व विजय हे दोन नर आणि जयलक्ष्मी ही मादी अशा तीन हत्तींना पहाटेच ट्रकमध्ये घालून गुजरातला रवाना करण्यात आले आहे. स्थानिकांचा कोणताही विरोध होऊ नये म्हणून भल्या पहाटे जनता साखर झोपेत असतानाच हे हत्ती गुजरातला पाठविण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
गडचिरोली जिल्ह्यात एकूण ११ हत्ती होते. त्यापैकी पातानील येथील तीन हत्ती गुजरातला नेल्यानंतर आता कमलापूर हत्ती कॅम्प येथे आठ हत्तीच शिल्लक राहिले आहेत. यातील हत्तीसुद्धा लवकरच गुजरातला पाठविण्यात येतील, असे बोलले जात आहे. यासंदर्भात वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर यांना विचारणा केली असता शुक्रवारी सकाळी पातानील येथील तीन हत्ती पाठविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.