VNI:-
गोंडवाना विद्यापीठात साहित्यिक आपल्या भेटीला उपक्रमांतर्गत व्याख्यानमालेची सुरुवात; ना.गो.थुटे
- साहित्याने मला मानसन्मान दिलाय ; ना.गो.थुटे
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : आपल्या आत क्षमता, प्रतिभा दडलेली असते. तीची जाणीव आपल्याला व्हायला हवी. कविता म्हणजे सत्याचा आविष्कार आहे. कवितेत कवितेला उपमा अलंकार देता आले पाहिजे. साहित्य अनेकार्थी करता आले. पाहिजे. आईला प्रसव वेदना झाल्याशिवाय बाळ जन्माला येत नाही तसेच साहित्यीकाला वेदना झाल्याशिवाय साहित्य जन्माला येत नाही. साहित्याने मला मान सन्मान दिलाय. अशा भावना प्रसिद्ध साहित्यिक व कवी ना .गो. थुटे यांनी व्यक्त केल्या. गोंडवाना विद्यापीठातील पदव्युत्तर शैक्षणिक मराठी विभागातर्फे 'साहित्यिक आपल्या भेटीला' उपक्रमांतर्गत व्याख्यानाचे आयोजन ' मी साहित्यिक कसा झालो'? या विषयावर आज करण्यात आले. त्या प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून प्रसिद्ध कवी आणि साहित्यिक ना .गो .थुटे
बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, पदव्युत्तर शैक्षणिक मराठी विभागाचे समन्वयक डॉ. श्याम खंडारे यांची उपस्थिती होती. यावेळी मराठी अभ्यास मंडळातील सहभागींची नावे असलेल्या फलकाचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
आपण आपले भवताल किती भावनाशील होऊन पाहतो आणि त्याचा आपल्या जगण्यावर किती परिणाम होतो, याचे दर्शन साहित्यातील विविध प्रकारांमध्ये दिसते. साहित्यिकाशी संवाद झाला पाहिजे, विद्यार्थ्यांकडूनही साहित्य निर्माण झाले पाहिजे. मराठी असे आमुची मायबोली, तिला बैसवू वैभवाच्या शिरी’ असे म्हणत, मराठी भाषेवरचे प्रेम व्यक्त करणाऱ्यासांठी उदात्त हेतूने प्रेरित होऊन या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले.
यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलतांना गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे म्हणाले, तरुण पिढीचे साहित्य मराठी भाषेत तयार व्हायला हवे. भरपूर वाचन केलं तर चांगले जमेल आणि अनेक कवींच्या कविता वाचल्यावर त्यातून आपल्यालाही चांगली कविता सूचते. विद्यार्थ्यांचे मराठीतले साहित्य संमेलन विद्यापीठात घेण्यात येईल असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी साहित्यिक ना.गो.थुटे यांच्याशी विद्यार्थ्यांनी संवाद साधला. ना.गो.थुटे यांचे परिचय वाचन पु़ंडलिक शेंडे , प्रास्ताविक शुभम बुटले, संचालन सविता गोविंदवार तर आभार प्रियंका बगमारे यांनी मानले.
या कार्यक्रमाला झाडीपट्टी कवी मा.डो. कवरासे, सु .नि.साठे, बंडोपंत बोढेकर यांच्यासह विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.